न्यूयॉर्क: अमेरिकेतील एका व्यक्तीनं समुद्राच्या पोटात जवळपास 36 हजार फूट खोल उडी घेतली आहे. ही जगातली सर्वात खोल उडी असल्याचा दावा त्यांनी आणि त्यांच्यी टीमनं केला. व्हिक्टर वेस्कोवो असं समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पॅसिफिक महासागरात त्यांनी उडी घेतली. यात त्यांना समुद्राच्या तळाशी प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. व्हिक्टर वेस्कोवो यांनी पॅसिफिक महासागराच्या दक्षिण टोकाला असलेल्या चॅलेंजर डीप भागातला समुद्राचा तळ गाठला. सर्वात खोल उडीचा विक्रम करण्यासाठी त्यांनी या भागाची निवड केली. व्हिक्टर यांनी समुद्राचा तळ गाठताना 10 हजार 927 मीटर (35 हजार 853 फूट) अंतर कापलं. यासाठी त्यांना चार तासांचा अवधी लागला. एकट्या व्यक्तीनं समुद्रात मारलेली ही सर्वात खोली उडी असल्याचा दावा त्यांच्या टीमनं केला. याआधी हा विक्रम टायटॅनिकचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांच्या नावावर होता, अशी माहिती व्हिक्टर यांच्या टीमनं दिली. पृथ्वीच्या जन्माबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकणाऱ्या चार प्रजाती यावेळी व्हिक्टर यांना आढळून आल्या. त्यांना समुद्राच्या तळाशी प्लास्टिकच्या पिशव्या आणि चॉकलेटचे रॅपर्सदेखील आढळून आले. माणसाच्या क्षमतेच्या मर्यादा किती विस्तारल्या जाऊ शकतात यासाठी समुद्रात खोल उडी मारण्याचा निर्णय घेतल्याचं व्हिक्टर यांनी सांगितलं. यंदाच्या ऑगस्टमध्ये आर्टिक समुद्रातल्या मॉलोय डीपमध्ये उडी घेऊन समुद्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
समुद्रात 36,000 फूट खोल जाऊन त्यानं विक्रम रचला; तळाशी सापडल्या प्लास्टिक पिशव्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:05 PM