गेल्या काही दिवसापूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याविरोधात सोशल मीडियावर अनेकांनी आवाज उठवला होता. आता या प्रकरणी आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे, डीपफेक व्हिडीओचा वापर करुन एका कंपनीला २०७ कोटींचा चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण हाँगकाँगचे आहे.
डीपफेक व्हिडीओचा वापर करुन फसवणूक केल्याची ही पहिलीच घटना आहे.यामध्ये कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांचे डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आले होते. त्यानंतर त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणात, घोटाळेबाजांनी कंपनीच्या हाँगकाँग शाखेतील कर्मचाऱ्यांना फसवण्यासाठी डीपफेकचा वापर केला आहे. यासाठी त्याने कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांचे डीपफेक व्हिडीओ तयार केले. यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सामील करण्यात आले. यामध्ये त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले होते.
या व्हिडीओ कॉलमध्ये पीडिता वगळता सर्व कर्मचारी बनावट होते. प्रत्येकाचा डीपफेक अवतार त्या मीटींगमध्ये उपस्थित होता. यासाठी घोटाळेबाजांनी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व्हिडीओ आणि इतर फुटेजचा वापर केला, जेणेकरून मीटिंगमध्ये उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती खरी वाटली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, यामध्ये एवढा मोठा घोटाळा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी कंपनी आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती दिलेली नाही. डीपफेक तंत्रज्ञान गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.
कंपनीच्या वित्त विभागाने हाँगकाँगमध्ये झालेल्या या फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळ्याचा बळी ठरलेल्या कर्मचाऱ्याने कॉल दरम्यान दिलेल्या माहितीचे पालन केले. त्याने ५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये १५ व्यवहार करून २०० मिलियन हाँगकाँग डॉलर्स हस्तांतरित केले होते.
कंपनीच्या मुख्यालयात कर्मचाऱ्याने याबाबत चौकशी केली असता हा घोटाळा असल्याचे समोर आले. रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर भारतात डीपफेकची चर्चा सुरू झाली. पॉप स्टार टेलर स्विफ्टचा एक डीपफेक फोटोही व्हायरल झाला आहे. तेव्हापासून जगभरातून डीपफेकबाबत कडक कायदे करण्याची मागणी होत आहे.