पॅरिसः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल लढाऊ विमान मिळवलं आहे. आता राजनाथ सिंह त्या विमानातून उड्डाण घेणार आहेत. विशेष म्हणजे राफेल विमान सोपवणार असल्याच्या मुहूर्तावरच राजनाथ सिंह म्हणाले, आज दसरा आणि हवाई दलाचा 87वा स्थापना दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. भारत आणि फ्रान्समधील राजकीय संबंध मजबूत होत आहेत. मी थोड्याच वेळात राफेलमधून उड्डाण करणार आहे. 36 राफेल लढाऊ विमानांसाठी 2016ला करार केला होता. मला आनंद आहे की, दिलेल्या वेळेतच राफेल विमानांची डिलीव्हरी होत आहे. राफेलमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून, त्याला एक प्रकारची ताकद मिळेल, असा मला विश्वास आहे. ते म्हणाले, राफेल हा एक फ्रेंच शब्द आहे. ज्याचा अर्थ वादळ असं आहे. मला आशा आहे, राफेल आपल्या नावाला खरा उतरेल. हवाई दलाची ताकद वाढवण्याचं आमचं लक्ष्य आहे. मी फ्रान्सचा आभारी आहे. राजनाथ सिंह यांनी सोमवारी पॅरिसला पोहोचल्यानंतर एक ट्विट केलं होतं की, फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर आनंद झाला. फ्रान्स हा भारताचा समुद्रातील महत्त्वाचा भागीदार देश आहे. शस्त्रपूजेनंतर राफेलमधून उड्डाण घेणार संरक्षण मंत्रीभारतीय हवाई दलाच्या स्थापना दिवस आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजेसाठी एका एअरबेस तयार करण्यात आलं आहे. शस्त्रपूजेनंतर राजनाथ सिंह राफेल विमानातून उड्डाण भरणार आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सप्टेंबर 2016ला भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल विमान खरेदी करण्याचा करार झाला होता. या सर्व विमानांची किंमत 7.87 अब्ज यूरो ठरविण्यात आली होती. भारतीय वायुसेना 24 पायलट तयार केले आहेत जे राफेल विमान चालवू शकतील. तसेच हे सर्व वैमानिक तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करतील. पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत सर्व राफेल विमान फ्रान्स भारताकडे सोपविणार आहे.