मॉस्को- भारतीय खाद्यपदार्थांनी जगभरातील विविध शहरांमधील हॉटेलांमध्ये शिरकारव केल्याचं आपल्याला माहिती आहेच. भारतीय मसाल्याची आमटी म्हणजे करीने तर युरोपीय देशांतील नागरिकांना अक्षरशः वेड लावले होते. रशियातही भारतीय खाद्यपदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत. पण तुम्ही बंगाली असलात मात्र मॉस्कोमध्ये तुम्हाला अगदी घरच्यासारखं बंगाली जेवण मिळू शकते. हे सगळं शक्य झालंय प्रद्योत आणि सुमन मुखर्जी या बंगाली लोकांमुळे.मॉस्कोमध्ये प्रद्योत आणि सुमन दोन रेस्टोरंटस् चालवतात. गेली 27 वर्षे ते दोघे मॉस्कोमध्ये राहात आहेत. टॉत ऑफ द टाऊन आणि फ्युजन प्लाझा नावाने ही रेस्टॉरंटस आहेत. भारतीयांची विशेष आवडीची चिकन, कबाब, शाकाहारी पदार्थांसह बंगाली पदार्थही येथे मिळतात. बंगाली लोक फुटबॉलप्रेमी आहेतच आता मॉस्कोमध्ये फुटबॉलबरोबर त्यांच्या आवडत्या बंगाली बदार्थांचा आस्वादही ते घेत आहेत.फिफा वर्ल्ड कप पाहायला आलेल्या लोकांना या दोन्ही हॉटेलांमध्ये 25 टक्के सूट दिली जात आहे. केवळ ओळखपत्र दाखवल्यास 25 टक्के सूट येथे मिळते. तसेच विविध स्पर्धांमधून भेटवस्तू देण्याची योजनाही करण्यात आलेली आहे.प्रद्योत हे स्वतः अर्जेंटिनाच्या चमूचे चाहते आहेत. ते म्हणतात मी उपउपांत्य सामन्याची, उपांत्य व अंतिम सामन्याची तिकिटे घेऊन ठेवलेली आहेत. जर अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला तर त्या रात्री माझ्या दोन्ही हॉटेलांमध्ये जेवण मोफत देईन. रेस्टोरंटस सुरु करण्यापुर्वी प्रद्योत हे औषधनिर्माण कंपनीत कार्यरत होते. संध्याकाळी सहा ते नऊ यावेळात भारतीय लोक मोठ्या संख्येने त्यांच्या हॉटेलात खाण्यासाठी येत आहेत. रशियाने पहिली मॅच जिंकल्यावर रशियात फुटबॉलप्रेमाचे वारे वेगाने वाहू लागल्याचे ते सांगतात..
आमार शोनार मॉस्को... वर्ल्ड कपसाठी रशियात गेलेल्या खवय्यांची चंगळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 3:14 PM