काठमांडू - सीमेवरील वाद आणि नागरिकत्व विधेयक या विषयावरुन भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळ पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा पक्ष आता फुटण्याच्या मार्गावर आहे. सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या नेपाळचे कार्याध्यक्ष पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर टीकेनंतर आता राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास ते पक्ष फोडतील असा इशारा प्रचंड यांनी ओली यांना दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. प्रचंड यांना पक्षातही मोठा पाठिंबा मिळत आहे. दोन माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अनेक खासदारांनी ओलीविरोधात जाहीर मोर्चा उघडला आहे. त्याचवेळी कोरोना व्हायरस संकाटातही ओली सरकारविरूद्ध नेपाळच्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.
पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत दहल म्हणाले की, सरकार लोकांच्या अपेक्षांवर काम करण्यास अपयशी ठरले आहे. अध्यक्ष आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अदलाबदल करून सत्ता वाटपाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाच्या एकीकरणादरम्यान आम्ही अदलाबदल करुन सरकार चालवण्याचे मान्य केले होते, पण मी स्वतः माघार घेतली. सरकारचे काम पाहिल्यानंतर असे वाटते की असे करून मी चूक केली आहे.
समाजवाद साधण्याचे आपले ध्येय साकारण्यात सरकार अपयशी ठरल्यास पुढील निवडणुकीत पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते असेही दहल म्हणाले. सरकार आणि पक्ष दोघेही संकटात आहेत. दुसरीकडे ओली यांनी सरकारचा बचाव करत असं म्हटलं की प्रशासन देशाच्या हितासाठी काम करत आहे. त्यात सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधी पक्षासारखं काम करत आहेत असा आरोप त्यांनी लावला.
केपी शर्मा ओली हे भारतविरोधी भावनांसाठी ओळखले जातात. २०१५ मध्ये भारताच्या विरोधानंतरही त्यांनी नेपाळी राज्यघटनेत बदल केला नाही आणि केपी शर्मा भारताच्या विरोधात चीनच्या गोटात गेले. नेपाळ सरकारने चीनशी करार केला. या अंतर्गत चीनने नेपाळला आपला बंदर वापरण्यास परवानगी दिली. पंतप्रधान केपी शर्मा ओली मागील निवडणुकीत भारताविरोधात अनेक विधानं केली होती. त्यांनी भारताची भीती दाखवत दुर्गम भागातील लोक आणि अल्पसंख्यकांना एकत्र आणत सत्ता काबीज केली.