वॉशिंग्टन : अमेरिकेत काही श्रीमंत व्यक्तींच्या एका गटाचे वर्चस्व वाढत असून, ते देशाच्या व लोकशाहीच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असे निरोपादाखल केलेल्या भाषणात मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता बायडेन यांनी त्यांच्यावर ही टीका केली. बुधवारी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला त्याने केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेतून माफी मिळता कामा नये. यासाठी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.
३५ आरोपांबाबत चाललेल्या खटल्यात न्यूयाॅर्क येथील न्यायालयाने १० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरविले होते. मात्र राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याने न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठविले नाही. या घटनेच्या संदर्भात बायडेन यांनी हे वक्तव्य केले. एक्स फ्लॅटफॉर्मचे मालक व उद्योगपती इलॉन मस्क व विवेक रामस्वामी या दोघांकडे ट्रम्प यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपविली. यावरही कोणाचेही नाव न घेता बायडेन यांनी टीकास्त्र सोडले.