ऑनलाइन लोकमत
फिलाडेल्फिया, दि. २७ - अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिलरी क्लिंटन या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.
फिलाडेल्फिया येथे झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत पक्षाच्या सर्व प्रतिनिधींनी अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी सिनेटर बर्नी सेंडर्सच्या समर्थकांनी हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. मात्र, पक्षाने हा विरोध दूर करत हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी दिली.
हिलरी क्लिंटन या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी आहेत. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये आता हिलरी क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिपब्लिकन पार्टीचे डोनॉल्ड ट्रम्प असणार आहेत.