कोपनहेगन : डेन्मार्कची राणी मार्गारेट द्वितीयने रविवारी अधिकृतपणे आपले सिंहासन सोडले आहे. मुलगा आणि युवराज फ्रेडरिकसाठी सिंहासन सोडणाऱ्या मार्गारेट द्वितीय या देशाच्या ९०० वर्षांच्या इतिहासातील पहिल्या सम्राट ठरल्या आहेत. त्यांच्या ५२ वर्षांच्या कार्यकाळात आपण सिंहासन सोडणार नाही, असे त्या नेहमी सांगत होत्या. मात्र, शस्त्रक्रिया आणि इतर आजारांमुळे त्या त्यांच्या शाही जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडू शकल्या नाहीत.
वेळ ही एक शक्तिशाली गोष्ट आहे, असे त्यांनी पद सोडण्याची घोषणा जाहीर करताना नवीन वर्षाच्या भाषणात सांगितले होते. लोकशाही राजेशाही प्रस्थापित होण्यापूर्वी, वास्तविक सत्ता धारण करणारा शासक त्याच्या सिंहासनाचा किंवा पदाचा त्याग करण्याऐवजी आजारपणामुळे किंवा हिंसाचारामुळे मृत्यू होईपर्यंत सिंहासनावर राहण्याची शक्यता होती.
मार्गारेट द्वितीय या त्यांचे वडील राजा फ्रेडरिक ९ यांच्या निधनानंतर सिंहासनावर बसल्या होत्या. अधिकृतपणे पद सोडल्यामुळे आता त्यांचा मुलगा फ्रेडरिक हा सिंहासनावर विराजमान होणार आहे.