Dennis Maliq Barnes: कोणत्याही विद्यार्थ्याचा शाळेपासून पदवीपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो किंवा भरगच्च पैसे मोजावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांचे त्यांच्या ‘ड्रीम कॉलेज’मध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न अधुरेच राहते.
पण, एका विद्यार्थ्याला एक-दोन नव्हे तर 170 कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. डेनिस मलिक बार्न्स असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. डेनिस बार्न्स अवघ्या 16 वर्षांचा असून, त्याला अतापर्यंत किमान 170 महाविद्यालयांमध्ये अॅडमिशन मिळाले आहे. याशिवाय त्याने 9 मिलियन डॉलरची शिष्यवृत्तीही मिळवली आहे.
डेनिस बार्न्सने ऑगस्ट 2022 मध्ये महाविद्यालयांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली होती. एका मुलाखतीत बार्न्सने सांगितले की, त्याने जवळपास 200 संस्थांमध्ये अर्ज केला आहे. यानंतर त्याच्या शाळेच्या प्रशासकांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला आहे. कारण बार्न्सच्या कामगिरीने नवीन विक्रम केला. बार्न्स 4.98 च्या GPA सह दोन वर्षे लवकर पदवीधर होत आहे.