बीजिंग : नव वर्षाच्या प्रारंभी बीजिंगवर दाट विषारी धूर व धुक्याची चादर असल्याने चीनने वायू प्रदूषणामुळे जारी केलेल्या आॅरेंज अलर्टचा कालावधी आणखी ३ दिवसांसाठी वाढवला.बीजिंगनगर पर्यावरण संरक्षण ब्युरोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रदूषणाबाबत आॅरेंज अलर्ट हा रेड अलर्टनंतर दुसऱ्या स्थानावर येतो. प्राथमिकरीत्या हा आॅरेंज अलर्ट मागील शुक्रवारपासून रविवारपर्यंत लागू होता. तो आता बुधवारी मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. बीजिंगने खूपच जास्त प्रदूषणामुळे रेड अलर्ट का जारी केला नाही, याबाबत टीका केली जात आहे. मागील दोन दिवसांत हे प्रदूषण अधिकच धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. या आणीबाणीच्या योजनेअंतर्गत जास्त प्रदूषण करणारी गॅसोलीन वाहने व कचरा नेणाऱ्या ट्रक्सच्या रस्त्यावरील दळणवळणास प्रतिबंध राहील.बीजिंगमध्ये प्रदूषणाच्या स्तराबाबत अलर्ट लागू करण्याचे चार टप्पे आहेत. रेड अलर्ट सर्वांत धोकादायक स्थितीत लागू केला जातो. त्याखालोखाल आॅरेंज, यलो व ब्लू अलर्ट जारी केला जातो. आॅरेंज अलर्टचा अर्थ असा आहे की, वायू गुणवत्ता निर्देशांक सलग तीन दिवस २०० पेक्षा अधिक राहील.
दाट धूर, धुक्यात बीजिंग गडप
By admin | Published: January 03, 2017 4:09 AM