सिडनी - प्रेम, सेक्स संबंधांच्या आरोपामुळे बार्नबाय जॉयस यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. जॉयस यांचे त्यांच्या मीडिया सेक्रेटरीबरोबरचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता. जॉयस यांच्यावर लैंगिक छळाचा नवीन आरोप झाल्यामुळे त्यांनी उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
नॅशनल पार्टीच्या नेतेपदाचाही आपण येत्या सोमवारी राजीनामा देऊ असे त्यांनी सांगितले आहे. जॉयस यांची नॅशनल पार्टी पंतप्रधान मालकोल्म टर्नबुल यांच्या सरकारमध्ये सहभागी आहे. जॉयस यांच्यापासून त्यांची मीडिया सेक्रेटरी गर्भवती असून ती लवकरच प्रसूत होणार असल्याची माहिती आहे.
जॉयस यांनी उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असला तरी ते त्यांचे संसद सदस्यत्व सोडणार नाहीत. कारण त्यांच्या राजीनाम्यामुळे टर्नबुल यांचे सरकार कोसळू शकते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जॉयस यांनी पदावरुन पायउतार व्हावे असे मालकोल्म टर्नबुल यांची इच्छा होती. त्यावरुन त्यांचे मतभेदही झाले होते.
जॉयस यांच्या विवाहाला 24 वर्ष झाली असून कौटुंबिक मुल्यांसाठी त्यांनी प्रचार केला होता. लैंगिक छळाचा नवीन आरोप झाल्यामुळे त्यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. आपण काहीही चुकीचे केलेले नाही असा जॉयस यांचा दावा आहे.