स्टॉकहोम : उपेक्षितांचा आवाज ठरलेली नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यासाठी यंदाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक नॉर्वेचे लेखक जॉन फॉस यांना जाहीर करण्यात आले आहे. स्वीडीश ऑस्कर अकादमीचे स्थायी सचिव मॅट्स माल्म यांनी गुरुवारी स्टॉकहोममध्ये पुरस्काराची घोषणा केली.
जॉन फॉस यांनी स्वत:ची लेखन पद्धती विकसित केली, जिला ‘फॉस मिनिमालिजम’ म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर त्यांची दुसरी कादंबरी ‘स्टेंग्ड गिटार’मध्ये दिसून येते. फॉस यांच्या लिखाणात दैनंदिन जीवनात होणाऱ्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे.
तेव्हा ते गाडी चालवत होते...
अकादमीचे स्थायी सचिव मॅट्स माल्म यांनी फोनद्वारे फॉस यांना विजयाची माहिती दिली, तेव्हा ते ग्रामीण भागात गाडी चालवत होते. घरी काळजीपूर्वक गाडी चालवत जाण्याचे वचन त्यांनी मला दिले होते, असे माल्म यांनी सांगितले.
सर्वात गाजलेल्या नाटककारांपैकी एक...
फॉस (वय ६५) देशातील सर्वात गाजलेल्या नाटककारांपैकी एक आहेत. त्यांनी सुमारे ४० नाटके तसेच कादंबरी, लघुकथा, मुलांची पुस्तके, कविता आणि निबंध असे विपुल लिखाण केले आहे. साहित्य नोबेल मिळविणारे ते नॉर्वेचे चौथे लेखक ठरले. फॉस यांची प्रसिद्ध रचना ‘अ न्यू नेम : सेप्टॉलॉजी’ २०२२ च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.
मानवी भावना अगदी सोप्या शब्दांत...
फॉस यांच्या लिखाणातून मजबूत भाषिक आणि स्थानिक संबंध दिसून येतात. हतबलता, भीती, नैराश्य अशा शक्तिशाली मानवी भावना अगदी सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचे कौशल्य फॉस यांच्या लिखाणात दिसून येते, असे मत निवड समितीतील सदस्यांनी व्यक्त केले. नाटक, कादंबरीपासून बालसाहित्यापर्यंत अशी बहुमुखी प्रतिभा असलेल्या फॉस यांना नॉर्डिक साहित्यातील दिग्गज लेखक मानले जाते.
स्वीडीश अकादमीने फोन केला, तेव्हा मला आश्चर्य वाटले. गेल्या १० वर्षांत हे घडू शकते या शक्यतेसाठी मी सावधपणे स्वत:ला तयार केले होते. पुरस्काराचा फोन आल्याने मला खूप आनंद झाला.