ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ७ - रशियाशी संबंध असल्याचा संशय असलेल्या स्मगलर्सच्या टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला अणूबाँब बनवण्यासाठी लागणारे साहित्य विकण्याचा प्रयत्न केल्याचे FBIच्या तपासात आढळले आहे. या टोळ्यांनी मध्यपूर्वेतील कट्टरतावाद्यांना अणूबाँब बनवण्यासाठी लागणारे साहित्य विकण्याचा चार वेळा केलेला केलेला प्रयत्न अमेरिकेच्या FBI ने गेल्या पाच वर्षात उधळल्याचे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे.
अनेक शहरांना हानी पोचवण्याची क्षमता असलेल्या अत्यंत धोकादायक अशा सिझीयम या मूलद्रव्याचा प्रचंड मोठा साठा एक स्मगलर विकण्याच्या तयारीत होता. या वर्षी फेब्रुवारीत FBI ने हा प्रयत्न उधळला आणि त्यावेळी विकत घेणारा गट इस्लामिक स्टेटचा असल्याचे समोर आले. अडीच दशलक्ष डॉलर्सना हा व्यवहार करायचे गोस्सू नावाचा स्मगलर आणि इस्लामिक स्टेटचा एक प्रतिनिधी यांच्यात घाटत होते.
मी देतो ते साहित्य डर्टी बाँबसाठी उत्कृष्ट आहे आणि इस्लामिक स्टेटसाठी अत्यंत कामाचे आहे असे उद्गार गोस्सूने त्याच्याशी झालेल्या बैठकीत काढले. इस्लामिक स्टेटशी तुझा संपर्क असेल तर हा व्यवहार सुरळित चालू राहील असेही गोस्सू म्हणाल्याचे समोर आले आहे.
FBI ने केलेल्या तपासात बाँब बनवण्याची क्षमता असलेले युरेनियम मध्यपूर्वेतील ग्राहकाला विकण्याचेही घाटत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेविषयी अत्यंत द्वेषपूर्ण भाषा स्मगलर्सच्या गँग वापरत होत्या आणि त्यादृष्टीनेच इस्लामिक स्टेट व मध्यपूर्वेतील ग्राहकांना अणूबाँबशी संबंधित साहित्य विकण्याचा प्रयत्न होत होता. पाश्चात्य देशांचे शत्रू असलेल्या इस्लामिक स्टेट व अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना गँग्सच्या माध्यमातून आण्विक संहारस्त्रे पुरवण्याची योजना आकाराला येत होती असा तर्क यातून काढण्यात येत आहे.
खबरे आणि FBI ची विश्वासू माणसे यांच्या माद्यमातून स्टिंग ऑपरेशन करून हे प्रयत्न उधळून लावण्यात आल्याचे वृत्त आहे. इस्लामिक स्टेटचा प्रतिनिधी असल्याचा बहाणा करत काही खब-यांनी या गँग्सच्या उद्दिष्टांचा भांडाफोड केला आणि हे प्रयत्न समोर आले.
रशियामधल्या काही भागांमध्ये युरेनियमच्या पुरवठ्याचे ब्लॅक मार्केट अस्तित्त्वात आले असून यामुळे जागतिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. या सगळ्या गुन्हेगारी गँग्सच्या म्होरक्यांपर्यंत FBI ला पोचता आलेले नाही हीदेखील एक काळजीची बाब मानण्यात येत आहे.
अमेरिकेच्या नाशासाठी इस्लामिक स्टेटच्या हाती अणूबाँब लागायला हवा असे मानणा-या रशियन गँग्स आहेत. अमेरिका व रशियाच्या दीर्घकालीन शत्रुत्वाची पार्श्वभूमीही या सगळ्याला आहे. आपला जुना शत्रू असलेल्या अमेरिकेच्या नायनाटासाठी तिला सगळ्यात मोठा शत्रू मानणा-या इस्लामिक स्टेटला अणूबाँब पुरवणे आणि अमेरिकेचा नाश करणे हे यामागचे सूत्र असल्याचे तपासात समोर आले आहे.