बीजिंग : भारत व चीन यांच्यातील सीमावादावर राजकीय तोडगा काढून हा वाद लवकरात लवकर मिटवावा असा निर्धार भारत व चीन यांनी आज केला. सीमावाद संपल्यास भारत व चीन यांच्यातील संबंधांना नवे वळण मिळेल व इतर कोणतेही नवे अडसर निर्माण होणार नाहीत, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. मोदी व चीनचे पंतप्रधान ली यांच्यात आज चर्चा झाली. चीनने भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबारेषेची (एलएसी- लाईन आॅफ अॅक्चुअल कंट्रोल) कल्पना स्पष्ट करावी, सीमावादावर कोणताही पूर्वग्रह वा आपल्या पदाचा विचार न करता निर्णय घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. अनिश्चिततेमुळे सीमाभागात संवेदनशील तणाव निर्माण होत आहे. या भागातील गावात कोठे एलएसी आहे याची माहिती दोन्ही बाजूच्या लोकांना माहीत नाही, असे मोदी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. सीमावाद, व्यापारी तूट, दहशतवाद, गुंतवणूक, हवामानातील बदल व संयुक्त राष्ट्रातील सुधारणा या मुद्यांचा समावेश त्यांच्या ९० मिनिटांतील चर्चेत होता. या चर्चेनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या काही दशकांपासून भारत व चीन यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. या संबंधांना चांगले वळण देणे ही दोन्ही देशांची ऐतिहासिक जबाबदारी आहे, असे मोदी याप्रसंगी बोलताना म्हणाले. आपल्याला सहकार्यातील शक्तीची जाणीव व्हायची असेल, तर आपल्यातील गैरसमज, अविश्वास असणाऱ्या बाबींवरही चर्चा झाली पाहिजे, असे मोदी म्हणाले. भारत व चीन यांच्या संबंधात काही मतभेद आहेत हे आम्ही नाकारत नाही, पण यावर चर्चा करण्यासाठी यंत्रणा आहे. तोडगा काढण्यासाठी पुरेशी राजकीय परिपक्वता आहे. दोन्ही देशांनी शांतता व पारदर्शकता ठेवावी, असे यावेळी चीनचे पंतप्रधान ली यांनी सांगितले. नाते जुळले पाहिजे आपण आपल्यातील सीमावाद आधी सोडविला पाहिजे. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे हे दोन्हीही देशांना माहीत आहे. आपली जबाबदारी ओळखून दोन्ही देशांनी ती पार पाडली पाहिजे व नव्या निर्धाराने पुढे गेले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी त्सिंगुआ विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना म्हणाले. आपण सीमावादावर जो तोडगा काढू त्याने केवळ सीमेची समस्या सुटली असे होता कामा नये, त्या तोडग्याने आपले नाते बदलले पाहिजे, असे मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
सीमावाद लवकर सोडविण्याचा निर्धार
By admin | Published: May 16, 2015 2:19 AM