वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा नवीन वर्षात बंदूक विक्रीवर निर्बंध आणू शकतात. गत काही वर्षांत अमेरिकेत वाढलेला बंदुकीचा अतिरेकी वापर आणि अगदी शाळेतही झालेल्या गोळीबाराच्या घटना या पार्श्वभूमीवर हा निर्णय होऊ शकतो. अॅटर्नी जनरल लोरेटा लिंच, एफबीआयचे संचालक जेम्स कोमी आणि कायदेविषयक विभागाचे अन्य अधिकारी यांच्यासोबत ओबामा लवकरच बैठक घेणार असून, याबाबत बैठकीत निर्णय होऊ शकतो. हिंसाचार रोखण्याच्या उद्देशाने बंदुकीच्या विक्रीबाबत नियम कडक करण्याचा विचार आहे.बंदुकीची विक्री करताना संबंधित व्यक्तीचे पूर्ण रेकॉर्ड बघितले जाईल. कारण, गत दोन वर्षांत अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत निष्पाप नागरिकांचा, मुलांचा नाहक बळी गेला आहे. आॅक्टोबरमध्ये रोजबर्ग येथे एका महाविद्यालयात गोळीबार झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर वेळोवेळी बंदुकीच्या अनिर्बंध वापराबाबत चर्चा झाली; पण याबाबत निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, आता ओबामा हे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बंदुकीच्या वापरावरच निर्बंध आणण्याच्या विचारात आहेत.(वृत्तसंस्था)
ओबामांचा बंदूक विक्रीवर निर्बंध आणण्याचा निर्धार
By admin | Published: January 05, 2016 12:30 AM