ढाका- बांगलादेशची राजधानी ढाका शहर आणि इतर देशाचा संपर्क तोडण्यात आंदोलक यशस्वी झाले आहेत. सर्व स्थानिक व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद पाडण्यात आंदोलकांना यश मिळाले. गेले पाच दिवस हे आंदोलन सुरु आहे. सुरक्षित प्रवासासाठी चांगले रस्ते मिळावेत यासाठी संपूर्णबांगलादेशात आंदोलन सुरु आहे.
रविवारी दोन महाविद्यालयीन तरुणांचा दोन बसमध्ये सापडून मृत्यू झाला. यामुळे हजारो नागरिक सरकारचा निषेध करण्यासाठी बाहेर पडले आणि संपूर्ण देशात हे आंदोलन पेटले. या आंदोलनाची धुरा विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये घेतली असून ते रस्त्यावरची प्रत्येक गाडी थांबवून चौकशी करत आहेत. प्रत्येक गाडीची नोंदणी झाली आहे का तसेच चालकाकडे परवाना आहे का याचीही चौकशी ते करत आहेत. एका मंत्र्याच्या गाडीची कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना गाडीमधून बाहेर पडावे लागले असे वृत्त काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. आज सकाळी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाचे चिन्ह राजधानी ढाक्यात दिसत नव्हते मात्र अचानक लोकांनी मानवी साखळी करत वाहतूक सुधारणा करण्याचे आवाहन सरकारला केले.रविवारी दोन बसेस ग्राहक मिळविण्यासाठी स्पर्धा करत होत्या. त्याच गडबडीमध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर दोन्ही चालक पळून गेले मात्र नंतर त्यांना अटक करण्यात आली. बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट वर्कर फेडरेशनचे वरिष्ठ नेते अब्दुर रहिम यांनी संरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही बसेस बाहेर काढणार नाही असे स्पष्ट केले आहे. आंदोलकांनी काही बसेस फोडल्या आहेत. आम्ही या व्यवसायामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. आंदोलनाच्या नावाखाली आमच्या बसेस जाळू देणार नाही, आम्हालाही संरक्षण पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.