India Japan vs Pakistan China: भारत आणि जपान हे एकमेकांचे सामरिक भागीदार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध अनेक दशकांपासून घनिष्ठ आहेत. यासोबतच हे दोन्ही मित्र देशही 'क्वाड'चे सदस्य आहेत. त्याचबरोबर भारत आणि जपान या दोघांचाही राजकीय शत्रू चीन आहे. चीन आणि जपान यांच्यातील संबंधही नेहमीच कटू राहिले आहेत. चीन आणि जपान सामरिक आणि राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दूर आहेत आणि दोन्ही देशांमध्ये नेहमीच अविश्वासाचे वातावरण राहिले आहे. राष्ट्रीय आणि ऐतिहासिक वादांमुळे चीनबद्दलची नकारात्मक भावना आधुनिक काळापर्यंत कायम आहे. त्यामुळे भारत आणि जपान यांनी संयुक्तपणे केलेला युद्ध सराव चीनचे 'टेन्शन' वाढवणारा असल्याची चर्चा आहे.
कुठे केला जातोय सराव?
भारत आणि जपान यांच्या मैत्रीचा मोठा इतिहास आहे. भारत आणि जपान हे दोन्ही देश एकत्र युद्ध सराव करत आहेत. यामुळे चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. भारत-जपानने दोन आठवड्यांपासून हा लष्करी सराव सुरू केला आहे. सुरक्षा आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपान राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे लष्करी सराव करत आहेत. हा पाकिस्तानच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. दोन्ही देशांच्या तुकडीत ४०-४० सैनिक आहेत. भारत-जपान धोरणात्मक सहकार्याच्या व्यापक आराखड्यांतर्गत भारतीय लष्कर आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यात 'धर्म संरक्षक' हा सराव आयोजित करण्यात आला होता. ही परस्पर भागीदारी चीनसाठी एक इशारा मानला जात असल्याचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा जाणकारांचे मत आहे.
चीनचा अनेक देशांशी वाद
चीनचा वाद हा केवळ भारताशीच नाही तर जपान, फिलीपिन्स, व्हिएतनाम अशा अनेक देशांशी आहे. ज्याप्रमाणे गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे, त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांत जपान आणि चीनचे नौदलही आमनेसामने आले आहेत. बहुतेक शेजारी देशांना चीनकडून वाढलेल्या सुरक्षेच्या धोक्यांचा सामना करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी अनेक देश भारताचे सहकार्य घेत असल्याचे चित्र आहे.