काबूल : अफगाणिस्तानमधील नव्या सरकारचे नेतृत्व तालिबानचे सह संस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर हे करतील, असे इस्लामिक गटातील सूत्रांनी शुक्रवारी म्हटले. नव्या सरकारची घोषणा शनिवारी केली जाणार आहे.
बरादर हे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत मुल्ला मोहम्मद याकूब, शेर मोहम्मद अब्बास स्टॅनकेझाई असतील. तालिबानचे सहसंस्थापक दिवंगत मुल्ला ओमर यांचे मुल्ला याकूब हे चिरंजीव आहेत. हे ज्येष्ठ नेते काबूलमध्ये आले असून नव्या सरकारच्या घोषणेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तालिबानचे सर्वोच्च धार्मिक नेते हैबतुल्लाह अखूनझादा हे धार्मिक विषयांवर आणि सरकारवर इस्लामच्या चौकटीत लक्ष ठेवतील.
४० मृतदेह सोडून काढला पळ
अफगाणिस्तानमध्ये तालिबान एकीकडे सरकार बनवण्याच्या तयारीत आणि जगाशी आपले संबंध स्थापन करण्याबद्दल बोलत आहे, तर दुसरीकडे पंजशीर भागात मात्र तालिबानला अजून ताबा मिळाला नाही. तेथे सतत संघर्ष सुरू आहे. सोमवारपासून पंजशीरमध्ये तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्सचे लढवय्ये यांच्यात युद्ध सुरू आहे. नॉर्दर्न अलायन्सचे म्हणणे असे की, जेथे गोळीबार झाला तेथे जवळपास ४० पेक्षा जास्त तालिबानींचे मृतदेह पडले होते. नंतर आम्ही हे मृतदेह परत करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी या दोन्ही पक्षांत गोळीबार झाला नाही.