वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंबाबत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. ट्रम्प यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जगभरातील नेत्यांनी दिलेल्या २,५०,००० डॉलर्सच्या (सुमारे २ कोटी सहा लाख रुपये) भेटवस्तूंची माहिती देण्यात ते अपयशी ठरले, असा अहवाल अमेरिकी काँग्रेसच्या पक्षांतर्गत समितीने दिला आहे. यात भारतीय नेत्यांनी दिलेल्या ४७,००० डॉलर्स किमतीच्या भेटवस्तूंचाही समावेश आहे. भेटवस्तूंचा अहवाल देण्यात माजी अध्यक्ष ट्रम्प अपयशी ठरले असे अहवालात म्हटले आहे.
ट्रम्प चोर आहे...ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मीला पैसे चारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ‘ट्रम्प चोर आहे’ असे पोस्टर धरून एक महिला न्यूयॉर्कमधील न्यायालयासमोर उभी होती.
भारतीय नेत्यांनी काेणत्या भेटवस्तू दिल्या?भेटवस्तूंमध्ये पंतप्रधान मोदी, तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भारतीय नेत्यांनी दिलेल्या ३८ लाख ८५ हजार रुपयेे किमतीच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. दस्तऐवजांनुसार भेटवस्तूंमध्ये योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ८,५०० डॉलरची फुलदाणी, ४,००० डॉलर किमतीचे ताजमहालचे मॉडेल, कोविंद यांनी दिलेला ६,६०० डॉलरचा भारतीय गालिचा, मोदी यांनी दिलेल्या १९०० डॉलरच्या कफलिंक्स यांचा समावेश आहे.