पॅरिस : ग्रीसच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाचा प्रश्न ग्रीस जर्मनीपाठोपाठ संपूर्ण युरोप आणि जगभराला भेडसावू लागला आहे. ग्रीक सार्वमतानंतर युरोप व आशियातील बाजार कोसळलेच आता विविध अर्थतज्ज्ञही याबाबत मते व्यक्त करू लागले आहेत. जगप्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांनी जर्मनीवर (ग्रीसचा सर्वात मोठा कर्जदार) टीका करत, जर्मनीने कधी कर्जे चुकविली आहेत ? असा सरळ प्रश्न विचारला आहे.थॉमस पिकेटी केवळ एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी जर्मनी आणि युरोपातील सर्व कॉन्झर्व्हेटिव्हजच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर्मनीने आजवर कधीच कोणाच्या कर्जांची परतफेड केलेली नाही. कोणत्याही आधारावर जर्मनीकडे इतर देशांना शिकविण्याचा अधिकार नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे. युरोपातील कॉन्झर्व्हेटिव्हज आणि विशेषत: जर्मनीतील कॉन्झर्व्हेटिव्हज युरोप आणि एकात्म युरोपाच्या कल्पना उद्ध्वस्त करत आहेत. अँजेला मर्केल या इतिहासातून काहीच शिकलेल्या दिसत नाहीत अशी टिप्पणी करुन पिकेटी पुढे म्हणाले, मर्केलबाईंना इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळवायचे असल्यास त्यांनी ग्रीसच्या कर्जप्रश्नावर तोडगा काढला पाहिजे.पिकेटी यांच्या जर्मनीवरील टीकेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (वृत्तसंस्था)१९५३ साली काय झाले होते?> दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम जर्मनीचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे ग्रीससह अनेक देशांनी नुकसानभरपाईची रक्कम माफ केली होती. लंडन अॅग्रिमेंट असे संबोधल्या जाणाऱ्या या करारास आंतरराष्ट्रीय कर्जमाफीच्या चांगल्या उदाहरणांपैकी एक मानले जाते. त्याचीच आठवण पिकेटी यांनी आता करुन दिली आहे. > युरोपची निर्मितीच कर्जमाफी आणि भविष्यातील गुंतवणुकीवर झालेली आहे, अनंत काळ प्रायश्चित्त घेण्यासाठी युरोेपची निर्मिती झालेली नाही हे लक्षात ठेवायला हवे अशा शब्दांमध्ये जर्मनीसह सर्व कर्जदार देशांचे कान पिकेटी यांनी उपटले आहेत.> थॉमस पिकेटी हे फ्रेंच अर्थतज्ज्ञ असून त्यांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, पॅरिस स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, एमआयटीमधून शिक्षण घेतले आहे. परखड मतासांठी ओळखल्या जाणाऱ्या पिकेटींचे कॅपिटल इन द टष्ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे.
जर्मनीने कधी देणी दिली आहेत का? थॉमस पिकेटी यांचा प्रहार
By admin | Published: July 06, 2015 11:51 PM