अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे जगभरात थेट प्रक्षेपण झाले. देशाबाहेर असलेल्या अनिवासी भारतीयांनीही २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेत आनंदोत्सव साजरा केला. अयोध्येत या सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर, लाखो भाविकांनी अयोध्या नगरी फुलून गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मोदींनी भारताला सक्षम आणि राम राष्ट्र बनविण्याचा संकल्प बोलून दाखवला. या सोहळ्याचा देशभरात आणि देशाबाहेरही उत्साह होता. त्यातच, आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ब्रिटीश पंतप्रधान आणि भारताचे जावई ऋषी सुनक हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी लंडनमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी, रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम हे भजन त्यांनी गायल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत ते हे भजनगीत गाताना दिसून येत आहेत. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी अक्षता मूर्ती आणि दोन कन्याही दिसून येत आहेत. मात्र, त्यांचा हा व्हिडिओ राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनीचा म्हणजेच २२ जानेवारी २०२३ रोजीचा नसून गतवर्षीच्या दिवाळीतील असल्याचं स्पष्ट होत आहे.
प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर श्रीरामाचे फोटो आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे थ्रीडी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. तसेच रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’च्या सदस्यांनी लाडू वाटून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मात्र, लंडनमधील कुठल्याही कार्यक्रमात पंतप्रधान ऋषी सुनक सहभागी झाले नव्हते. त्यांचा हा व्हिडिओ जुना आहे.
अयोध्येत दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती आहे. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर प्रभू रामाचे पोस्टर झळकवण्यात आल्याचेही व्हिडिओ प्रसारीत होत आहेत. मात्र, याबाबतही अद्याप कुठलीही खात्रीशीर माहिती नाही.