न्यूयॉर्क : अमेरिकेचा माजी गुप्तचर अधिकारी सेवानिवृत्त मेजर डेव्हिड ग्रुश यांनी अमेरिकेकडे एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
डेव्हिड ग्रुश यांनी दावा केला की, अमेरिका अज्ञात उडणाऱ्या वस्तू (यूएफओ) शोधण्यासाठी ‘विरुद्ध अभियांत्रिकी’चा (रिव्हर्स इंजिनिअरिंग) दीर्घकाळ चालणारा कार्यक्रम लपवत आहे. अमेरिकेचा एलियन्सशी थेट संबंध आहे. परंतु त्याचा पुरावा नाही. ग्रुश यांनी हाऊस ओव्हरसाइट उपसमितीसमोर हा दावा केला. जून महिन्यात ग्रुश यांनी दावा केला होता की, यूएफओचे (उडती तबकडी) अवशेष आणि एलियनचे मृतदेह अमेरिका सरकारकडे आहेत. या दाव्यानंतर वॉशिंग्टनमधील हाऊस ओव्हरसाइट कमिटीने या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. याअंतर्गत २६ जुलै रोजी ग्रुश यांनी आपल्या निवेदनात या मुद्याचा पुनरुच्चार केला.
दाव्यांमध्ये किती तथ्य?
ग्रुश यांनी सांगितले की, सरकारला एक अमानवी जीव मिळाला होता. परंतु त्यांनी स्वतः असा जीव पाहिला नाही. अमेरिकेने कोसळलेल्या यूएफओचे अवशेष गोळा करून त्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला होता, असेही त्यांनी म्हटले.
सरकार म्हणते...
अमेरिकेने पुरावे लपवल्याचा ग्रुश यांचा दावा नाकारला आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भूतकाळात अस्तित्वात असलेल्या किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या सामग्रीचा ताबा किंवा रिव्हर्स-इंजिनीयरिंग यासंबंधीचा कोणताही कार्यक्रम असल्याच्या दाव्यांच्या समर्थनार्थ तपासकर्त्यांना कोणतीही माहिती आढळली नाही.