मुंबई: जगाच्या अर्थव्यवस्थेला किती खनिज तेलाची गरज आहे, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न ओपेक आणि तेलाचं उत्पादन घेणारे इतर देश करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला किती खनिज तेलाची आवश्यकता आहे, याचं गणित करून तेल उत्पादक देश लवकरच एक मर्यादा निश्चित करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रशिया आणि सौदी अरेबियाला खनिज तेलाचं उत्पादन वाढवण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकेतील कंपन्यांना गॅसोलीन कंपन्यांना दरांमध्ये कपात करण्याचं आवाहनदेखील केलं आहे.
ओपेक प्लस संघटनेचं नेतृत्त्व सौदी अरेबियाच्या हातात आहे. जगातील तेलाच्या राजकारणात रशियाचं स्थानदेखील महत्त्वाचं आहे. त्यामुळेच बायडन यांनी दोन्ही देशांना तेल उत्पादनात वाढ करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढला असताना तेलाच्या दरांमध्ये प्रचंड घसरण झाली. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्यानं खनिज तेलाची मागणी घटली. त्याचा परिणाम तेल उत्पादक देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला.
कोरोना काळात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तेल उत्पादक देशांनी आता खनिज तेलाचं उत्पादन कमी केलं आहे. त्यामुळे तेलाचे दर वाढले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी देत उत्पादक देशांकडे उत्पादन वाढीचा आग्रह धरला आहे. बायडन यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास केवळ अमेरिकेचाच नव्हे, भारताचाही फायदा होईल.
भारतात गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाठ वाढल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली. पेट्रोलचे दर ५ रुपयांनी, तर डिझेलचे दर १० रुपयांनी कमी झाले. यानंतर देशातील अनेक राज्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात केली आहे.