वॉशिंग्टन : मानवाच्या पहिल्या चांद्रसफरीच्या वेळी अपोलो-११ च्या अंतराळवीरांनी १९६९ मध्ये टिपलेल्या ८,४०० छायाचित्रांचे अत्यंत मनोहारी असे डिजिटल रूपांतरण नासाने जारी केले आहे. त्यामुळे यापूर्वी कधीही न दिसलेली चंद्राची छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत.चांद्र मोहिमेत त्यावेळी ‘नासा’ने चंद्रावर केवळ अंतराळवीरच नाही, तर त्यांच्या सोबत त्या काळातील अत्यंत उच्च दर्जाचे कॅमेरेही पाठवले होते. त्या कॅमेऱ्यांनीच टिपलेल्या या छायाचित्रांचे जतन करून ती डिजिटलाईज करण्यात आली आहेत. त्यामुळे या चित्रांचा दर्जा उंचावला आहे. त्यामुळे ती आणखी मनोहारी दिसतात. त्यातील काही छायाचित्रे चंद्रावर उतरण्यापूर्वी, तर काही छायाचित्रे चंद्रावरून माघारी येताना टिपण्यात आलेली आहेत. या छायाचित्रांचा दर्जा उंचावून त्यांचे डिजिटलीकरण करण्यास बरेच परिश्रम पडले. या छायाचित्रांचे डिजिटलीकरण करण्यास प्रदीर्घ अवधी लागला. ‘प्रोजेक्ट अपोले अर्काईव्ह’ या प्रकल्पाच्या कामास जवळपास २००४ मध्ये प्रारंभ झाला. जॉन्सन अवकाश केंद्रात ही प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेत सर्व मूळ छायाचित्रे स्कॅन करण्यात आली आणि तसे करताना त्यांचा दर्जा उंचावण्यात आल्याचे या प्रकल्पाशी निगडित कीप टॅग यांनी ‘प्लेनेटरी सोसायटी’ला सांगितले.मुळात या छायाचित्रांंचा दर्जा म्हणावा तसा समाधानकारक नव्हता. त्यांचा दर्जा उंचावताना त्यांचा रंग आणि चमक यांची थोडी तडजोड करावी लागली. चित्रांचा आकारही कमी करून १,००० डीपीआय (डॉट्स प्रति इंच) करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण नव्याने प्रक्रिया करावी लागली, असे कीप टॅग म्हणाले.
१९६९ साली टिपलेल्या चांद्रसफरीच्या छायाचित्रांचे नासातर्फे डिजिटल रूपांतर
By admin | Published: October 04, 2015 4:00 AM