ऑनलाइन लोकमत
ब्रासिलिया, दि. १२ - ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा दिलीमा रौसेफ यांची ब्राझीलमधील सत्ता संपुष्टात आली आहे. रौसेफ यांच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून, आता त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालणार आहे. रौसफ यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मतदान झाले. त्यात त्यांच्या बाजूने २२ तर विरोधात ५५ मते पडली.
ब्राझीलची सूत्रे आता उपराष्ट्रपती आणि रौसेफ यांचे राजकीय विरोधक मायकल टिमर यांच्या हाती गेली आहेत. रौसेफ यांची गच्छंती झाल्यामुळे ब्राझीलमध्ये तेरावर्षांपासून असलेली डाव्या विचारसरणीची सत्ता संपुष्टात येणार आहे. ब्राझील लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश आहे. रौसेफ यांच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर होताच विरोधक सिनेटर्सनी टाळयांचा एकच कडकडाट केला.
बजेट कायद्याचे उल्लंघन करुन निधी वापरल्याचा रौसेफ यांच्यावर आरोप आहे. रौसेफ यांचे सहा महिन्यांसाठी निलंबन झाले आहे. पीएमडीबी पक्षाचे मायकल टिमर आता ब्राझीलचे हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज संभाळणार आहेत. रौसेफ यांच्या पक्षाची दशकभरापासूनची राजवट संपुष्टात आली आहे.