कोणाचं काही असू द्या, कोणी काहीही म्हणून द्या, पण प्रत्येकाचं खाण्यावर आणि आपल्या ‘पोटावर’ प्रेम असतं. त्यामुळेच आपल्या आहाराबाबत आणि तब्येतीबाबत अत्यंत जागरूक असलेले लोकही अनेकदा आपल्या जिभेच्या चवीला महत्त्व देताना दिसतात. जगभरात झपाट्यानं उभी राहिलेली कोट्यवधी हॉटेल्स आणि तिथे गर्दी करणारे अब्जावधी खवय्ये हे त्याचंच द्योतक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या चवीचं खाण्यासाठी त्यामुळेच सगळीकडे झुंबड उडालेली दिसते.
जगभरातल्या खवय्यांसाठी अशीच एक हटके संधी आता चालून आली आहे. त्यांच्यासाठी एक अवकाशयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेकरूंना अवकाशात पृथ्वीच्या टोकावर डिनर दिले जाणार आहे. याशिवाय अवकाशातून निसर्गाचा अवर्णनीय नजारा अनुभवत असतानाच सूर्योदयाचा विलोभनीय देखावाही त्यांना बघायला मिळणार आहे.
अमेरिकेची स्पेस ट्रॅव्हल कंपनी ‘स्पेस व्हीआयपी’नं याची जबाबदारी घेतली आहे. सहा तासांची ही हायटेक बलून यात्रा असेल. यातील सगळ्याच गोष्टी हायटेक आणि हटके असतील. या अंतरिक्ष यात्रेसाठी आणि अंतराळातील डिनरसाठी नेदरलँड्सचा जगप्रसिद्ध शेफ रसमस मंक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या वर या खवय्यांना आणि अवकाशप्रेमींना नेलं जाणार आहे. तिथे त्यांना वर्णनातीत अशा भोजनाचा आस्वाद घेता येईल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगभरातील केवळ काही भाग्यवंतांनाच ही संधी मिळेल. किती असतील हे भाग्यवंत? - तर केवळ सहा!
ज्यांची पाच लाख डॉलर्स (म्हणजे केवळ ४ कोटी १७ लाख रुपये!) भरायची तयारी आहे आणि ज्यांचा ‘लकी ड्रॉ’मध्ये नंबर लागेल त्यांनाच प्रत्यक्षात हे ‘तिकीट’ मिळेल. या उपक्रमाला मोजक्याच लोकांचा प्रतिसाद मिळेल असं आयोजकांना वाटत होतं; पण केवळ २४ तासांच्या आतच हजारो लोकांनी आम्ही या ट्रिपसाठी इच्छुक आहोत असं कळवलं आणि त्यासाठी अक्षरश: ‘रांगा’ लावल्या.!
‘स्पेस व्हीआयपी’चे संस्थापक रोमन चिपोरुखा यांचं या संदर्भात म्हणणं आहे, सगळ्याच इच्छुकांची मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाही, याबद्दल आम्हाला खेद आहे; पण हा आमचा पहिलाच उपक्रम असल्यानं या प्रवासाची किंमतही अधिक आहे. येत्या काळात आम्ही आणखी ट्रिप आयोजित करू. त्यावेळी आणखी स्वस्तात आम्हाला ही ट्रिप आयोजित करता येईल आणि आत्ता ज्यांनी नावं नोंदवली आहेत, त्यांचा आम्ही प्राधान्यानं विचार करू.
या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे समुद्रसपाटीपासून तब्बल एक लाख फुटांवर या चाहत्यांना नेलं जाईल आणि तिथे त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय अशी मेजवानी दिली जाईल. ३२ वर्षीय अंतरराष्ट्रीय शेफ रसमस मंक हेदेखील आपल्या ग्राहकांना शाही खाना खिलवण्यासाठी उत्सुक आहेत. पुढच्या वर्षी ही ट्रिप अंतराळात नेण्यात येणार असली तरी त्याच्या शाही मेन्यूची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. अनेक पर्याय तपासले जात आहेत. रसमस मंक हे नेदरलँड्समधील ‘अलकेमिस्ट’ या जगद्विख्यात रेस्टॉरंटचे प्रमुख शेफ आहेत. गेल्या वर्षी जगातील सर्वोत्कृष्ट पन्नास रेस्टॉरंटमध्ये अलकेमिस्टचा पाचवा क्रमांक आला होता! जगातील सर्वोत्कृष्ट चवीच्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत गेल्या चार वर्षांत अलकेमिस्टला दोन वेळा ‘मिशेलिन स्टार’ मिळाला आहे. हा स्टार मिळवणं हे जगभरातील नामांकित रेस्टॉरंट्सचं प्रमुख ध्येय असतं. रसमस म्हणतात, ‘ही चव तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि अंतरिक्षाच्या थीमवरच हा शाही खाना असेल, एवढंच फक्त मी आत्ता तुम्हाला सांगू शकतो.’
‘स्पेस पर्स्पेक्टिव्हज’ या कंपनीनं या प्रवासासाठी खास नेपच्यून स्पेसशिप तयार केलं आहे. अर्थात हे काही रॉकेट नाही. यात एक कॅप्सूल असेल आणि स्पेस बलूनच्या साहाय्यानं ती अवकाशात नेली जाईल! ‘नासा’नं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या प्रवासाची बहुतांश तयारी पूर्ण झालेली असली तरी पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल २०२४पासून त्याची टेस्ट ड्राइव्ह सुरू होईल!
अंतराळात खाण्या-खिलवण्याची स्पर्धाअंतराळातील भोजनासाठी जगभरातील श्रीमंतांचं याकडे लक्ष लागून राहिलं असलं तरी अशा प्रकारचं हे पहिलंच आयोजन नाही. फ्रान्सची जगप्रसिद्ध कंपनी जेफाल्टोनं गेल्या वर्षी अशाच प्रकारची घोषणा केली होती. अंतराळात एक बलून पाठवून त्याद्वारे तेही गर्भश्रीमंतांना शाही खाना खिलवणार आहेत. त्यासाठीचा दर त्यांनी सुमारे १.०९ कोटी रुपये इतका जाहीर केला होता. त्यांना मात्र २०२५ मध्ये ही संधी मिळेल. यामुळे अंतराळातही खाना खिलवण्याची एक नवी, श्रीमंत स्पर्धा सुरू होईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.