बीजिंग : ‘सिल्क रोड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन काळात युरोपीय देशांशी व्यापार करण्याच्या खुश्कीच्या मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने थेट लंडनला रेल्वेने माल पाठविण्यास सुरुवात केली आहे.वस्तू व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या पूर्व चीनमधील यिवू या शहरातून या नव्या रेल्वेमार्गावरील पहिली मालगाडी रवाना झाली. खजागस्तान, रशिया, बेलारुस, पोलंड, जर्म नी, बेल्जियम, फ्रान्स आणि इंग्लंड अशा आठ देशांतून तब्बल १२ हजार किमीचा प्रवास करून ही मालगाडी १८ दिवसांनी लंडनला पोहोचेल.यिवू शहराच्या औद्योगिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या यिवू टायमेक्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कंपनीतर्फे ही रेल्वे मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे.‘सिल्क रोड’ योजनेनुसार चीनने याआधी युरोपमधील इतरही अनेक शहरांशी थेट रेल्वेने व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत. अलीकडेच यिवू ते स्पेनची राजधानी माद्रिदपर्यंत अशीच थेट मालगाडी सुरू करण्यात आली. रेल्वेने मालवाहतूक करण्यास हवाई वाहतुकीच्या तुलनेत निम्मा खर्च येतो व सागरी वाहतुकीच्या तुलनेत निम्मा वेळ लागतो. साहजिकच यामुळे बाजारपेठेत माल कमी खर्चात व लवकर पोहोचविता येतो. चीनची अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्यातप्रधान आहे. दोन दशके मोठ्या वेगाने विकसित झालेल्या चिनी अर्थव्यवस्थेला गेली दोन वर्षे काहीशी मंदी आली आहे. तिला पुन्हा उभारी देण्यासाठी निर्यातीसाठी नवे मार्ग व नव्या बाजारपेठा शोधण्यावाचून पर्याय नाही. या नव्या रेल्वेमार्गाने व्यापार आणि वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या पश्चिमेकडील शिनजियांग प्रांतास बराच फायदा होईल. चीन आणि ब्रिटन हे सशक्त व्यापारी भागीदार आहेत. प्राचीन रेशीम मार्गांचा मागोवायुरोपीय प्रभाव आणि आधुनिक अर्थकारण जगावर हावी होण्याआधी सुमारे हजार वर्षांपूर्वी भारत आणि चीन या दोन सशक्त अर्थव्यवस्था होत्या. त्यांचा व्यापार सातासमुद्रांच्या पलिकडे युरोप आणि आफ्रिकेतील देशांशी व्हायचा. सागरी वाहतूक आणि रस्ता म्हणजेच खुश्कीच्या मार्गाने हा व्यापार व्हायचा. रेशमाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चाले. व्यापाऱ्यांचे काफिले त्या काळी ज्या रस्तामार्गाने जात ते मार्ग प्राचीन ‘सिल्क रोड’ म्हणून ओळखले जातात. विविध युरोपीय देशांपर्यंतची रेल्वेने थेट मालवाहतूक हा त्याचाच एक भाग आहे.
चीनहून लंडनला थेट मालगाडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2017 2:26 AM