लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये पेजर बॉम्बस्फोटांमुळे गोंधळ उडाला आहे. हा हल्ला नियोजित होता. एकापाठोपाठ एक पेजर स्फोट झाल्याने लेबनॉनमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्लाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. या संपूर्ण प्रकरणात पेजर बनवणाऱ्या तैवानच्या कंपनीने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
या हल्ल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष हसू चिंग कुआंग यांनी हा स्फोट ज्या उत्पादनांमध्ये झाला, ते उत्पादन आमचे नव्हते. त्या उत्पादनांसाठी फक्त आमचे ब्रँड नाव वापरले आहे. आम्ही जबाबदार कंपनी आहोत. मात्र ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे, असंही ते म्हणाले.
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
"आमच्या कंपनीने हे पेजर बनवले नाहीत. हे पेजर युरोपियन कंपनीने बनवले होते. या कंपनीला आमच्या कंपनीचा ब्रँड वापरण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी हे पेजर्स तयार करणाऱ्या कंपनीचे नाव उघड केले नाही, असंही तैवानच्या कंपनीने म्हटले आहे.
लेबनॉनची राजधानी बेरूत आणि दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागात, पूर्वेकडील बेका खोऱ्यात स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता स्फोट सुरू झाले. हा भाग हिजबुल्लाचा महत्वाचा मानला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट सुमारे तासभर सुरू होते. दानियाह परिसरातील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना सुमारे तासभर स्फोटाचे आवाज ऐकू येत होते.
पेजर का वापरतात?
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाच्या सर्वोच्च नेतृत्वाने आपल्या सैनिकांना संवादासाठी मोबाईल किंवा इंटरनेटऐवजी पेजर वापरण्याचे आदेश दिले होते. यामागचे कारण म्हणजे इस्रायली आर्मी आणि मोसाद हिजबुल्लाहच्या सैनिकांच्या ठिकाणाचा सतत मागोवा घेतात. पेजरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लोकेशन ट्रॅक करता येत नाही.