स्टॉकहोम : प्रथिनांच्या संरचनेचा वेध घेण्यासाठी, तसेच प्रथिनांचे संगणकीय डिझाइन बनविण्याच्या कामगिरीसाठी तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. अमेरिकेत वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत असलेले डेव्हिड बेकर आणि लंडनमधील ब्रिटिश-अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा असलेल्या गुगल डीप माइंड येथील डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर हे तीन संशोधक या पुरस्काराचे विजेते ठरले आहेत. अमिनो आम्ल अनुक्रम आणि प्रथिने संरचना यांच्यातील संबंधांबद्दलचे संशोधन संशोधकांनी केले आहे.
प्रथिनांची निर्मिती शक्य
या प्रथिनांचा उपयोग फार्मास्युटिकल्स, लस, नॅनोमटेरियल आणि लहान सेन्सर म्हणून केला जाऊ शकतो. बेकर व त्यांच्या संशोधन गटाने तयार केलेल्या प्रथिनांच्या डिझाइनची संख्या व त्यातील विविधता हा मनाला आनंद देणारा विषय आहे. त्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानाव्दारे आता आपण कोणत्याही प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती करू शकतो.
२०२० साली डेमिस हसाबि, जॉन जम्पर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रथिनांचा कोड शोधला. त्यामुळे निसर्गातील कोणत्याही ज्ञात प्रथिनांच्या जटील संरचनेचा अंदाज लावणे व त्याचा अभ्यास करणे शक्य झाले.
मॉडेल काय ?
हॅसाबिस आणि जम्पर यांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल तयार केले. ते संशोधकांनी निश्चित केलेल्या २० कोटी प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावण्यास सक्षम आहे. प्रथिने हे रेणू असून ते हाडे, त्वचा, केस आणि ऊती तयार करतात. जगण्यासाठी शरीर कसे कार्य करते हे समजून घेण्याकरिता प्रथम आपल्याला प्रथिनांचा. जीवन कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी, प्रथम प्रथिनांची रचना जाणून घेणे आवश्यक आहे.
मानवजातीला फायदा
- नवीन प्रथिने तयार करणे, निसर्गातील बहुविध साधनांचा आपल्या संशोधनासाठी कसा वापर करायचा हे शिकणे ही समस्या डेव्हिड बेकर यांनी सोडविली.
- नवीन प्रथिने तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी संगणकीय साधने डेव्हिड बेकर यांनी विकसित केली. या संशोधनाचा मानवजातीला फायदा होणार आहे.
- डेव्हिड बेकर यांनी सांगितले की, रसायनशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार माझ्यासह तिघांना जाहीर झाला ही अतिशय आनंदाची बाब आहे.