सॅन फ्रान्सिस्को, दि. 15 : गुगलमध्ये नोकरी मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. भरमसाठ पगार आणि सुख-सुविधा त्या कर्मचा-यांना मिळतात. इतर मोठ्या कंपनीत मिळणा-या सुविधांपेक्षा गुगलच्या कर्मचा-यांना मिळणा-या सुख-सुविधा नक्कीच वरचढ आहेत. त्यामुळे गुगलच्या कर्मचा-यांबद्दल हेवा वाटणे साहजिकच आहे. पण गुगलमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना असे अजिबात वाटत नाही. मात्र माध्यमांच्या वृत्तानुसार समोर आलेलं वास्तव वेगळेच आहे. गुगलमध्ये काम करणाऱ्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी पगारात पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली आहे.
फोर्च्युनमध्ये आलेल्या वृत्तानुसार सॉफ्टवेअर अभियंता, कम्यूनिकेशन विशेषज्ञ आणि व्यवस्थापक या पदावर असलेल्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी गुगलविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. कॅलिफोर्नियातील गुगलच्या कार्यालयात आम्ही काम करतो. इथं आम्हाला पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो. मात्र पुरुषांचे आणि आमचे काम सारखच आहे. त्याचप्रमाणे काही वेळा आम्हाला असे काम दिले जाते की त्याद्वारे आमची पदोन्नती होण्याती शक्यता कमी असते. असा आरोप कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी केला आहे.
या माजी कर्मचा-यांनी गुगलमध्ये काम करताना त्यांना आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहचवले. गुगलमध्ये काम करणा-या एका वरिष्ठ कर्मचारी ज्यो कैनेला गुगल कंपनी बाहेरून जितकी चांगली दिसते, तितके आतले वातावरण नक्कीच चांगले नसल्याचे सांगितले. यातल्या अधिकाअधिक कर्मचा-यांचा वेळ हा गुगल फूड खाण्यात , गुगल गिअर घालून फिरण्यात आणि गुगलच्या फोनवरून गुगल मेल पाठवण्यात जातो. अशा वातावरणात काम करणे म्हणजे तुमचे वैयक्तिक आयुष्य हरवण्यासारखेच आहे असे त्यांनी सांगितले.
येथे तुम्हाला तुमच्या सुखाच्या सगळ्या गोष्टी मिळतील पण स्वातंत्र्य मात्र मिळणार नाही अशी खंत ज्यो यांनी बोलून दाखवली. तर इथल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर ब्लाद यांनीही असाच काहीसा अनुभव सांगितला. येथील कर्मचारी एकमेकांशी क्वचितच बोलतात. समोरच्या व्यक्तीशी बोलून तुम्हाला जर फायदा होणार असेल तरच ते संवाद साधण्यासाठी येतात. अन्यथा एकमेकांशी चर्चा करण्यात कोणालाही रस नसतो. तर गुगलमध्ये कित्येक वर्षे काम करुनही बढती मिळत नसल्याचे एका इंजिनिअरने सांगितले.
येथे बढती मिळण्यासाठी अनेक कर्मचा-यांना आठ आठ वर्षे वाट पाहावी लागते असा धक्कादायक खुलासाही त्याने केला. जगातले सगळ्यात हुशार कर्मचारी येथे काम करतात. त्या हुशार कर्मचा-यांची आपल्याला सिद्ध करण्याची स्पर्धा असते आणि या स्पर्धेत तो इतका हरवून जातो की एकमेकांत मिळून मिसळून वागणे विसरतो असाही अनुभव एकाने कोराच्या वेबसाईटला सांगितला.