अफगाणिस्तानमध्येतालिबानची सत्ता आल्यापासून सर्वसामान्यांना जगणं अत्यंत कठीण झालं आहे. सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. लोकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. अन्नासाठी त्यांना हात पसरावे लागत आहेत. तसेच महिलांची स्थिती ही अत्यंत वाईट आणि दयनीय झाली आहे. तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. मुलीच्या उपचारासाठी एका आईवर आपला मुलगा विकण्याची वेळ आली आहे.
एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट आता समोर आली आहे. मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे हवेत, म्हणून एका महिलेने स्वतःच्या मुलाला विकलं आहे. टोलो न्यूजनं दिलेल्या रिपोर्टनुसार, या महिलेने पोटच्या मुलाला फक्त काही हजार रुपयांमध्ये विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या 13 वर्षांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलाला काळजावर दगड ठेवत विकून टाकलं. लैलुमा असं या महिलेचं नाव असून काबुलच्या तंबूमध्ये ती राहते. मुलीचा जीव वाचवण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठलाही उपाय तिच्याकडे नव्हता असं तिने म्हटलं आहे. देशातील लोक आपल्याकडे असलेल्या वस्तू विकून अन्नधान्य खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत
तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी माजली आहे. देशात अन्नधान्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. आपल्या मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत आणि मुलांना सुरक्षित निवारा देण्यासाठी घरंदेखील नाहीत. अनेक नागरिक सध्या विस्थापितांच्या छावण्यांमध्ये राहत असून प्रचंड हालअपेष्टा सहन करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये नागरिकांना कडाक्याच्या थंडीत कुठे आणि कसं राहायचं, हा प्रश्न सतावतो आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर अनेक नागरिक विस्थापित झाले असून ते छावण्यांमध्ये राहत आहेत. यामध्ये मुलांचे मात्र प्रचंड हाल होत असून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तालिबानींनी महिलेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ
काही दिवसांपूर्वी तालिबानींचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड झाला होता. तालिबानींनी एका महिलेवर गोळ्या झाडल्या असून तिच्या कुशीत तेव्हा 6 महिन्यांचं बाळ असल्याची माहिती मिळाली होती. अफगाणिस्तानातील 30 वर्षांची फरवा तालिबानच्या जुलमी राजवटीला विरोध कऱण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. तालिबानविरोधी आंदोलनात सहभागी होत होती. आंदोलनामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र तरीदेखील ती तालिबानींना विरोध करत होती. त्यामुळेच तालिबानींनी तिचे निर्घृणपणे हत्या केली. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांची तालिबान हत्या करत आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांचा जीव घेत आहे.