इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून युद्धाची भाषा येऊ लागली आहे. तर काश्मीर मुद्दा भारताचा अंतर्गत मामला नाही असं पाकिस्तानकडून जगाला सांगण्यात येत आहे मात्र चीनशिवाय इतर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नसल्याने पाक बिथरला आहे.
शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे. अण्वस्त्र संपन्न दोन्ही देशांचे युद्ध झाले तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशी पोकळ धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर आम्ही त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं इम्रान खान यांनी सांगितले आहे.
यावेळी इम्रान खान म्हणाले की, आमचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरात कोणती कारवाई केली तर त्याला निपटण्यासाठी सज्ज आहे हे मी मोदींना सांगू इच्छितो. जगाला हे माहित आहे जर अण्वस्त्र संपन्न देशात युद्ध झालं तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. मी ज्यांना भेटतो त्यांना ही गोष्ट आर्वुजून सांगतो असंही त्यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असताना जगातील सर्व देश मौन बाळगतात. सर्व जगाला माहित आहे की, काश्मीरात काय परिस्थिती आहे. काश्मीरात मुस्लीम नसते तर सर्व जग त्यांच्यामागे उभं राहिलं असतं. काश्मीर कठीण संकटातून जात आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला.
बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकला नाकारत असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आता ही गोष्ट कबुल केली. भारतीय लष्कर बालाकोटप्रमाणे पीओकेमध्ये काहीतरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सभेच्या वार्षिक सभेत काश्मीर प्रकरण पुन्हा लावून धरणार आहोत. आरएसएस हिंदूंना श्रेष्ठ समजते. त्यामुळे मुस्लिमांना काश्मीरात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे असा आरोपही इम्रान खान यांनी केला.