जिनिव्हा : आगामी काळात कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात यश आले तरी पुढील वर्षी जून महिन्याच्या आधी या लसीचे जनतेसाठी वितरण सुरू होणे शक्य नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यावर्षीच्या अखेरच्या तिमाहीकडे सारे जग वाटचाल करत आहे. वर्षअखेरीस तरी कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना उपलब्ध होईल, अशी आशा काही जणांना वाटत असली तरी जागतिक आरोग्य संघटनेचे मत निराळे आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, जगात विविध ठिकाणी कोरोना लस विकसित करण्याचे प्रयोग सुरू असले तरी मानवी चाचण्यांच्या सर्व टप्प्यांत या लसीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत हे प्रयोगांमध्ये सिद्ध होणे आवश्यक असते.
काही लसींच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू असला तरी हे प्रयोग पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचे आढळल्यासच तिच्या सार्वत्रिक वापरासाठी परवानगी देण्यात येईल. त्या म्हणाल्या की, ज्या लसींच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष या वर्षअखेरीपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हाती येतील, अशी अपेक्षा आहे.
वास्तव समजून घ्या
कोरोना प्रतिबंधक लस विकसित केल्यानंतर तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे आवश्यक असते. त्यासाठी संबंधित देशांना व कंपन्यांना तयारी करावी लागेल. हे सर्व बघता पुढील वर्षीच्या दुसºया सहामाहीच्या सुरुवातीला ही कोरोना प्रतिबंधक लस जनतेला उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे कोरोना लस काही महिन्यांतच उपलब्ध होणार, असे वाटणाऱ्यांनी वास्तव परिस्थिती समजून घेतली पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लसीचे जगातील अनेक देशांना करोडो, अब्जावधी डोस लागणार आहेत, असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.