इस्रायलमध्ये (Israel) खोल समुद्रात 900 वर्ष जुनी तलवार (Sword)सापडली आहे. एका स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीने ही प्राचीन तलवार शोधली आहे. दरम्यान, ही ऐतिहासिक तलवार धर्मयुद्धावेळी (Crusades) लढणाऱ्या एखाद्या सैनिकाची असेल आणि काही कारणास्तव ही तलवार समुद्रात पडली असावी, असे म्हटले जात आहे. (Israeli diver finds 900 year old sword, said to be Crusader knight's weapon, on Mediterranean seabed)
'मिरर यूके' च्या रिपोर्टनुसार, श्लोमी काटझिन (Shlomi Katzin) नावाची व्यक्ती समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग करत होती. त्यावेळी जवळपास 200 मीटर खोल समुद्रात गेल्यानंतर एक विचित्र वस्तू दिसली. त्यानंतर श्लोमी काटझिन यांनी जवळ जाऊन पाहिले, तेव्हा त्यांना समजले की, ती तलवार (Crusader Sword) आहे. तलवार खूप जुनी होती. त्यावर अनेक गोष्टींचे अवशेष होते.
श्लोमी काटझिन यांनी ही तलवार समुद्रातून बाहेर काढली. त्यानंतर ही तलवार इस्रायल पुरातन प्राधिकरणाकडे (IIA) दिली. यावेळी त्यांना सांगण्यात आले की, ही तलवार एका क्रुसेडरची (Crusader) होती आणि ती सुमारे 900 वर्षे जुनी आहे. तर इस्रायल पुरातन प्राधिकरणाचे रॉबरी प्रिव्हेंशन युनिट इंस्पेक्टर निर डिस्टेलफेल्ड (Nir Distelfeld) म्हणाले की, "या तलवारीचे योग्य त्या स्थितीत जतन करण्यात आले आहे. एक सुंदर आणि दुर्मिळ शोध आहे आणि वरवर पाहता ती क्रुसेडर नाइटची होती."
दरम्यान, पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तलवारीचे एक मीटर लांब ब्लेड आणि 30 सेमी हँडल आहे. पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ही तलवार एका योद्ध्याची आहे, जो धार्मिक युद्धादरम्यान (Religious War) लढला होता. त्यावेळी अशा योद्ध्यांना क्रुसेडर म्हटले जात होते. आता ही तलवार साफ करून अभ्यास केला जाईल.