पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अनेक पाकिस्तानी नेत्यांनी गुरुवारी देशातील हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत, ‘‘आपल्या हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो’’, असे म्हटले आहे. (Imran Khan Wishes Happy Diwali)
दिवाळी हा हिंदू समाजासाठी सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक उत्सव आहे. पाकिस्तानातील 40 लाख हून अधिक हिंदूंनी त्यांच्या धार्मिक परंपरेप्रमाणे प्रकाशाचा हा उत्सव साजरा केला. पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी, नियोजन आणि विकासमंत्री असद उमर आणि मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनीही हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख शहबाज शरीफ यांनी ट्विट केले आहे की, "दिव्यांचा हा सण संपूर्ण जगात शांतता, प्रेम आणि आनंदाचे माध्यम बनावा."
बिलावल भुट्टो काय म्हणाले ? -पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आपण दिवाळीचा संदेश समजून घ्यायला हवा. ही (दिवाळी) आपल्याला शिकवते की वाईट कितीही शक्तिशाली असो, सातत्याचा संघर्ष आणि वचनबद्धतेने त्याचा पराभव निश्चित आहे.’’