इस्लामाबाद/न्यूयाॅर्क : प्रकाशपर्व असलेल्या दिवाळीच्या उत्साहाने केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील अनेक देश उजळून निघाले असून, पाकिस्तान, अमेरिकेसह अनेक देशांत हा सण दिमाखात साजरा केला जात आहे. पाकिस्तानात पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी हिंदू-शीख बांधवांसोबत बुधवारी दिवाळी साजरी केली. तर अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये हे प्रकाशपर्व साजरे करण्यात आले. विशेष म्हणजे या सणानिमित्त अमेरिकेत १ नाेव्हेंबर राेजी प्रथमच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पाकिस्तानात मुख्यमंत्री मरियम यांनी केली आतषबाजीपाकिस्तानात पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी हिंदू-शीख बांधवांसह दिवाळी साजरी केली. त्यांनी दिवा लावून या दिवाळी उत्सवाचे उद्घाटन केले. अभासी माध्यमाने आतषबाजीही केली. अल्पसंख्याकांवर कुणी अत्याचार करीत असेल तर पीडित समुदायाच्या सोबत आपण कायम आहोत, असे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले. मरियम यांनी दिवाळी भेट म्हणून १४०० हिंदू कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे धनादेश वाटप केले.
इस्रायलने दिल्या शुभेच्छाइस्रायलचे परराष्ट्र मंत्री केट्झ यांनी गुरुवारी भारतीयांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या़. भारतासारखाच आपला देशही लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या विचारांतून उज्ज्वल भविष्यासाठी परस्पर सहकार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुमारे १५०हून अधिक देशांत दिवाळी आज आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुुळे जगभरातील देश परस्परांशी जोडले गेले असून अशा देशांत भारतीयांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सुमारे १५० हून अधिक देशांत छोट्या-मोठ्या प्रमाणात दिवाळी सण साजरा केला जातो. याला स्थानिक सरकारचाही पाठिंबा असतो. यंदाच्या वर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे प्रथमच शाळांना दिवाळीनिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. तेथील शाळा उद्या १ नोव्हेंबर रोजी बंद राहाणार असून त्यामुळे सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांना दिवाळीचा आनंद मनसोक्त लुटता येणार आहे.