‘सहेला रे’ हा मराठी चित्रपट प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झाला. मृणाल देव कुलकर्णी यांनी ‘सहेला रे’ या चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवाद, अभिनय आणि दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या बाजू सांभाळल्या आहेत. मुख्य भूमिकेत असणाऱ्या मृणाल देव कुलकर्णी यांनी एका नितांत सुंदर नात्यावर सुरेख गोष्ट लिहली असून, तितक्याच संयमाने दिगदर्शित केली आहे. सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्याही सुंदर भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटात एका अशा मित्राची गोष्ट आहे, जो खूप वर्षांनी आपल्या मैत्रिणीला भेटतो आणि तिला तिच्या स्वत्वाची जाणीव करून देतो. अगदी हळुवारपणे उलगडत जाणारा हा चित्रपट आहे. स्री देवी कट्टा ,वॉशिंग्टन डी. सी. मेट्रो एरिया अमेरिका यांच्या 'कट्टा मीठा बोल - २' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी यांच्याशी विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा झाल्या. ऑनलाइन झूम लिंकद्वारे मृणाल आणि स्री देवी कट्टा चे सभासद एकत्र आले होते. अश्विनी मुकादम यांनी मृणालची मनमोकळी मुलाखत घेतली आणि मृणालनेही खूप दिलखुलासपणे सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
मृणालच्या अगदी पहिल्या चित्रपटापासून ते सहेला रे पर्यंतचा तिचा प्रवास, तिच्या मुख्य आणि सर्वांच्या लक्षात राहणाऱ्या अशा रमा, अवंतिका, सोनपरी आणि जिजाऊ या सगळ्या भूमिकांबद्दल सविस्तर चर्चा झाली. मुलाखती दरम्यान प्रेक्षकांसाठी त्रिविआच्या प्रश्नोत्तरांमुळे मुलाखतीची रंगत आणखीनच वाढत गेली. मृणालला असलेली गडकिल्ल्यांची आवड ही तिचे आजोबा आणि प्रसिद्ध लेखक गो. नि. दांडेकर यांच्यामुळे निर्माण झाली असे तिने आवर्जून सांगितले.
स्त्री देवी कट्टा सभासदांनी या दरम्यान ‘सहेला रे’ या चित्रपट पाहून त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या ‘सहेला रे’ चित्रपटाविषयीच्या भावना मृणालशी व्यक्त केल्या. स्त्री देवी कट्टा सभासदांनी मृणालचे तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगाचे फोटो एकत्र गुंफून एक सुंदर चित्रफीत तयार केली होती. मृणालला स्त्री देवी कट्टाची हि भेट अतिशय आवडली. कट्टा मिठा बोल -२ या मध्ये ‘लिखित का लेखा-जोखा’ या नवीन सेगमेंट ची सुरवात झाली, सोशल मीडियावर असलेले मृणालचे अपडेट्स आणि त्यावर असणाऱ्या विनोदी कंमेंट्स यावर मृणालची प्रतिक्रिया याने मुलाखतीची गोडी वाढवली.
साधारण दोन तास मृणालशी तिचे चित्रपट मालिका आणि त्यानिमताने स्मिता तळवलकर, वैभव जोशी यांसारख्या कलाकारांबरोबर आलेले तिचे अनुभव, मृणालची गडकिल्ल्यांची आवड आणि तिने ‘सहेला रे’ चित्रपटासंबंधी सांगितलेला स्त्रीत्वाचा प्रवास यामध्ये कधी वेळ संपला कळले नाही. गडकिल्ल्यांवर असलेल्या प्रेमापोटी एका चित्रपटाचे चित्रीकरण त्यांनी राजगड येथे प्रत्यक्ष केले होते, तेही २०० लोकांच्या टीमने, हे आवर्जून नमूद करण्यासारखे.
मुलगी, आई, बायको, सून आणि अभिनयामधील करिअर अशी तारेवरची कसरत अतिशय समर्थपणे कुटुंबाच्या मदतीने साधता आली, असे मृणालने प्रांजळपणे नमूद केले. तसेच नवीन पिढीला या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी, सांभाळण्यासाठी काही सल्लेही दिले.अतिशय सुंदर मुलाखतीची सांगता प्रियाने सगळ्यांचे आभार मानून केली त्याबरोबरच मृणालकडून लवकरच अमेरिका दौऱ्याचे आश्वासनही घेतले.
स्त्री देवी कट्टाने आयोजित केलेल्या मृणाल कुलकर्णी समवेतच्या गप्पांमुळे सर्वांची दिवाळी २०२२ अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण झाली.अनुराधा जुवेकर अंबरनाथ यांनी लिहिलेली खालील प्रतिक्रिया खूप बोलकी आहे…
अश्विनीने स्त्री देवी कट्ट्यावरून घेतलेली मृणालची खुमासदार मुलाखत ही होती दिवाळीची मेजवानी...मुलाखतीची खूपच मजा लुटली लहान- थोर सर्वांनी ...अविरत कष्ट ,चिवट चिकाटी, अफाट मेहनत नि जबरदस्त आत्मविश्वास यातूनच स्वप्नं साकारली जातात...आणि सकस ,सरस, सक्षम, आणि समृद्ध अशा कलाकृती आकारास येतात..नारीशक्तीचे सामर्थ्य वाखाणण्यासारखे...आपले घर सांभाळताना ते होऊ नये पारखे...मृणाल ने दिला आपल्याला हा कानमंत्र...आता हेच स्वीकारू या आपल्या जीवनाचे तंत्र...प्रियाचा अमाप उत्साह आणि दुर्दम्य इच्छाशक्ती प्रकर्षाने जाणवली...आणि पुढील सुंदर कार्यक्रमांची अपेक्षा दुणावलीसर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.पुढील वाटचालीस लाख, लाख शुभेच्छा
स्त्री देवी कट्टा वर्षभर अतिशय सुंदर आणि खूप सारे परंपरा जपणारे उपक्रम आयोजित करत असतात. सातासमुद्रापार राहणाऱ्या मराठी महिला आणि कुटुंबीयांसाठी हे सर्व कार्यक्रम म्हणजे आपल्या संकृतीची अनुभूती आणि नवीन पिढीला आपल्या परंपरांची ओळख आहे.प्रिया जोशी यांनी २०१६ मध्ये अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी महिलांना आपली संस्कृती परंपरांचा वारसा जपण्यास, पुढे नेण्यास आणि वृद्धिंगत करण्यासाठी स्त्री देवी कट्टाची सुरुवात केली. गेली ६ वर्ष हे काम अथकपणे सुरू आहे आणि त्यासाठी सर्व माध्यमांमधून मदत करण्यात येत आहे. एकंदरीत स्त्री देवी कट्टा ही महिलांनी महिलांसाठी बनवलेली एक व्हर्च्युअल सपोर्ट सिस्टीम आहे.
लेखिका - प्रणाली बाबर संपादिका - प्रिया जोशी वॉशिंग डी. सी. मेट्रो एरिया, अमेरिका