प्रश्न- फिंगरप्रिंटची नोंद करण्याचं ठिकाण बदलल्याचं ऐकलं. मी फिंगरप्रिंटची नोंद करणं गरजेचं आहे का? त्यासाठी कुठे जावं लागेल?उत्तर- होय, 14 वर्षांखालील आणि 79 वर्षांवरील व्यक्ती वगळता व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या सर्वांना व्हिसाच्या मुलाखतीआधी फिंगरप्रिंटची नोंद करावी लागते. स्टुडंट किंवा टुरिस्ट असे नॉन इमिग्रंट प्रकाराचे व्हिसा असो किंवा इमिग्रंट व्हिसा असो, फिंगरप्रिंट स्कॅनिंग आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला बायोमॅट्रिक अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्या ठिकाणी तुमच्या हाताचे ठसे आणि फोटो घेतला जातो. यासाठीच्या अपॉईंटमेंटसाठी www.usatraveldocs.com/in या संकेतस्थळाला भेट द्या. परिनी क्रेसेन्झो, 101, पहिला मजला, ए विंग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व येथे नवं व्हिसा अॅप्लिकेशन सेंटर आहे. हे सेंटर मुंबईतील दूतावासाच्या जवळ आहे. बायोमेट्रिक अपॉईंटमेंटसाठी किंवा पासपोर्ट घेऊन जाण्यासाठी मुंबईतील अॅप्लिकेशन सेंटरची निवड करणाऱ्यांना या नव्या ठिकाणी जावं लागेल. तुम्ही भारतातील कोणत्याही व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरवर (व्हिएसी) जाऊन फिंगरप्रिंट स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्ही व्हिसा मुलाखतीच्या 45 दिवस आधी व्हिएसीमधून अपॉईंटमेंट घेऊ शकता. मात्र अनेकजण दूतावासातील मुलाखतीच्या एक दिवस अगोदर फिंगरप्रिंट स्कॅनिंग पूर्ण करतात. ज्या दिवशी तुम्ही बायोमेट्रिकसाठी अपॉईंटमेंट घेतली आहे, त्या दिवशी व्हिएसीमध्ये या. त्यावेळी सोबत कन्फर्मेशन लेटर आणि व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रं सोबत आणा. ही प्रक्रिया अतिशय सोपी असते. यात तुमचा फोटो काढला जातो आणि तुमच्या हातांची दहा बोटं स्कॅन केली जातात. ही प्रक्रिया डिजिटल असल्यानं ती अतिशय पटकन होते. तुमच्या अर्जावरील माहिती योग्य आहे का, तुम्ही आवश्यक कागदपत्रं आणली आहेत का, याची पडताळणी बायोमेट्रिक अपॉईंटमेंट दरम्यान करण्यात येते. यामुळे व्हिसा मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट घेताना जास्त वेळ जात नाही. व्हिसा मुलाखतीदरम्यान तुमचे फिंगरप्रिंट आणि फोटो यांची पडताळणी होते. यामधून योग्य व्यक्तीच मुलाखतीला आली आहे ना, याची खात्री पटते.
अमेरिकेच्या व्हिसासाठी फिंगरप्रिंट स्कॅनिंग गरजेचं आहे का? त्यासाठी नेमकं कुठे जावं लागेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 6:23 AM