प्रश्न- अमेरिकेतून कनेक्टिंग फ्लाइट पकडायची असल्यास व्हिसा गरजेचा असतो का? लेओव्हर 2-3 तास असला तर?उत्तर- होय, व्हिसा व्हेवर प्रोग्रामसाठी पात्र नसणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रवास करताना अमेरिकेत थांबायचं असल्यास व्हिसा गरजेचा असतो. कनेक्टिंग फ्लाईटदरम्यानचा कालावधी कितीही असला, तरी व्हिसाची आवश्यकता असते. तुम्ही अमेरिकेतलं विमानतळ न सोडता पुढच्या प्रवासाला निघणार असाल, तरीही व्हिसा गरजेचा असतो. काही देशांमध्ये (बर्मुडा किंवा कॅरेबियन बेटांवरील देश) जाताना अमेरिकेतूनच जावं लागतं, याची जाणीव अमेरिकेच्या दूतावासाला आहे. तर काही देशाच्या नागरिकांना कमी अंतराच्या प्रवासासाठी अमेरिकेचा व्हिसा गरजेचा नसतो. भारतीय नागरिकांना अमेरिकेतून पुढे जायचं असल्यास त्यांच्याकडे वैध व्हिसा हवा. तुमच्याकडे वैध प्रवासी (बी1/बी2) व्हिसा असल्यास, तुम्ही अमेरिकेतून पुढे जाण्यासाठी त्याचा वापर करू शकता. भारतीय नागरिकांना दहा वर्षांच्या कालावधीसाठी बी1/बी2 व्हिसा दिला जातो. त्यामुळे अमेरिकेतून पुढे जाण्यासाठी स्वतंत्र व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला अमेरिकेतल्या मित्राच्या घरी जायचं असल्यास किंवा फिरायचं असल्यास प्रवासी व्हिसा असणं गरजेचं आहे. अमेरिकेत थोडा वेळ थांबायचं असल्यास आणि लगेच दुसऱ्या देशात जाण्यासाठी निघायचं असल्यास वेगळ्या प्रकारचा व्हिसा दिला जातो. या व्हिसाला सी-1 व्हिसा म्हटलं जातं. या व्हिसामुळे अमेरिकेत दीर्घ काळ मुक्काम करता येत नाही. तुमच्या प्रवासाचा अवधी सी-1 व्हिसाच्या अटी, शर्तींमध्ये बसत असल्यास तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. याबद्दलची माहिती http://www.ustraveldocs.com/in उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिसाचं शुल्क भरून बायोमेट्रिक्स अपॉईनमेंट घ्यावी लागते. यानंतर तुम्हाला मुलाखत द्यावी लागते. तुमच्या प्रवासाचा तपशील यावेळी द्यावा लागतो. तुम्ही अमेरिकेतल्या कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबणार आहात, याची तपशीलवार माहिती देणं गरजेचं असतं. तुम्ही पुढील विमानात चढण्याआधी किती वेळ प्रतीक्षा करणार आहात, त्याचा किमान कालावधी द्यावा लागतो. अनेकदा प्रवासी विमानतळदेखील सोडत नाहीत. मात्र प्रवासाचा तपशील दिल्यावर व्हिसा मिळेलच असं नाही. सी-1 आणि बी-1/बी-2 व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी असलेले निकष जवळपास सारखेच आहेत. सध्या अमेरिकेकडून भारतीयांना पाच वर्षांपर्यंतच्या मुदतीचा सी-1 व्हिसा दिला जातो. त्यामुळे अमेरिकन दूतावासाकडून बी-1/बी-2 व्हिसासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. या व्हिसाची मुदत सी-1 व्हिसाच्या दुप्पट आहे. बी-1/बी-2 व्हिसाचा वापर ट्रान्झिट आणि टुरिझम अशा दोन्हींसाठी वापरता येतो.
अमेरिकेतून कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी व्हिसा गरजेचा असतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:00 AM