वॉशिंग्टन : एच-१बी वर्क व्हिसा कार्यक्रमाचा दुरुपयोग करून अमेरिकन कामगारांशी भेदभाव करू नका, अशा इशारा ट्रम्प सरकारने कंपन्यांना दिला आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या व व्यवसायिकांत या व्हिसा कार्यक्रमाला मागणी आहे. कंपन्यांनी अमेरिक कंपन्या आणि कामगारांशी भेदभाव करण्यासाठी एच-१ बी व्हिसा प्रक्रियेचा उपयोग केल्यास न्याय विभाग ते खपवून घेणार नाही, असे कार्यकारी महाधिवक्ता टॉम व्हीलर यांनी म्हटले. सरकारने १ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षासाठी एच-१ व्हिसाचे अर्ज घेणे सुरू केले असताना हा इशारा देण्यात आला. अमेरिकन नागरिक आणि स्थलांतर सेवेने (यूएससीआयएस) एच-१बी व्हिसाचा ‘दुरुपयोग आणि फसवणूक’ टाळण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली. सरकार यावर्षी एच-१बी व्हिसाला मंजुरी देताना कडक भूमिका घेईल, अशी घोषणा यूएससीआयएसने केली आहे. यूएससीआयएस यावर्षी सामान्य श्रेणीत ६५ हजार एच-१बी व्हिसा तर अन्य २० हजार अर्ज जारी करणार आहे. ट्रम्प यांनी एच-१बी व एल-१ व्हिसा कार्यक्रम कडक करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, यूएससीआयएसने एच-१बी व्हिसात फसवणूक आणि गैरप्रकार रोखण्यासाठी एक ई-मेल हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)>कॉम्प्युटर प्रोग्रामर कौशल्यप्राप्त पात्र नाहीसामान्य कॉम्प्युटर प्रोग्रामर आता वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यप्राप्त व्यावसायिक म्हणून पात्र ठरणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य असणे ही एच-१बी व्हिसासाठी अनिवार्य अट आहे. कॉम्प्युटर प्रोग्रामरला यातून वगळल्याचा एच-१बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या हजारो भारतीयांवर परिणाम होऊ शकतो. हा निर्णय अमेरिकेने दीड दशकापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत आहे.ही मार्गदर्शक तत्त्वे नव्या सहस्राब्धीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जारी करण्यात आली होती. प्रवेश पातळीचे कॉम्प्युटर प्रोग्रामर आता सामान्यपणे वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय पात्रतेत स्थान मिळवू शकणार नाहीत, असे यूएससीआयएसने स्पष्ट केले.वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय पात्रतेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे यूएससीआयएसने ३१ मार्च रोजी जाहिरातीद्वारे स्पष्ट केले होते. या निर्णयाचा आगामी आर्थिक वर्षासाठी एच-१बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या हजारो भारतीयांवर परिणाम होऊ शकतो. पुढील वर्षासाठीच्या एच-१बी व्हिसाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.
एच-१बी व्हिसाचा दुरुपयोग करू नका
By admin | Published: April 05, 2017 4:43 AM