बीजिंग - मालदीवमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे आशियातील दोन महाशक्ती असलेले भारत आणि चीन हे देश आमने-सामने आले आहेत. मात्र मालदीवमध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटातून मार्ग काढण्यासाठी आपण भारताच्या संपर्कात असल्याचे चीनने म्हटले आहे. मालदीवप्रश्नी भारतासोबत वाद निर्माण करण्याची आमची इच्छा नाही. हा मालदीवचा देशांतर्गत प्रश्न असून, तो हाताळण्यासाठी तो देश सक्षम आहे. त्यामुळे या प्रश्नी कुठल्या बाहेरील शक्तीने हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे मत चीनने मांडले आहे. मालदीवमधील राजकीय संकटावर तोडगा काढण्यासाठी भारताने विशेष पथके तैनात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर चीनने या प्रकरणी बाहेरील देशांनी हस्तक्षेप करू नये, असे वक्तव्य केले होते. चीनच्या सूत्रांनी सांगितले की डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संकटानंतर आता मालदीव प्रश्नावरून भारतासोबत अजून एक वाद निर्माण करण्याची चीनची इच्छा नाही. गतवर्षी डोकलाम येथे भारत आणि चीनचे लष्कर आमनेसामने आले होते. त्यानंतर कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीनने खोडा घातल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला होता. दरम्यान, मालदीवमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबिया, चीन आणि पाकिस्तानसाठी आपले दूत रवाना केले आहेत. मात्र मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारतात आपला दूत पाठवलेला नाही. मालदीव सरकारच्यावतीने सांगण्यात आले की, राष्ट्रपतींनी दिलेल्या आदेशांनुसार मालदीवच्या कॅबिनेटमधील सदस्य मालदीवच्या मित्र राष्ट्रांच्या दौऱ्यावर जात आहेत. हे दूत देशांतर्गत घडामोडींविषयी आपल्या मित्र देशांना माहिती देतील. मालदीवचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानमध्ये गेले आहेत. तर वित्तविकास मंत्री चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, मालदीवचे कृषीमंत्री सौदी अरेबियाला जाणार आहेत. मात्र देशात आणीबाणी घोषित ढाल्यानंतर परिस्थितीची माहिती देण्यासाठी मालदीवकडून भारतात कोणताही दूत पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी मालदीवच्या राष्ट्रपतींचे विशेष प्रतिनिधी भारतात आले होते. तेव्हा त्यांनी भारत हा आमच्या मित्रांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले होते. मात्र देशातीत सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताला डावलण्यात आल्याचे वृत्त मालदीवच्या दूतावासाने फेटाळले आहे.
मालदीव प्रश्नावरून भारतासोबत वाद नको, प्रकरण चर्चेद्वारे हाताळू, चीनची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 6:17 PM