नवी दिल्ली - पाकिस्तानने ‘लढाऊ देश’ बनण्याऐवजी ‘व्यापारी देश’ बनावे आणि चीनच्या हातचे प्यादे बनू नये, असा सल्ला अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत राहिलेले हुसैन हक्कानी यांनी दिला आहे.एका वृत्तसंस्थेशी बोलताना हक्कानी म्हणाले की, पाकिस्तानने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की, दहशतवादाशी संंबंधित हाफीज सईद याचे समर्थन करायचे, की आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता आणि सन्मान प्राप्त करायचा आहे. चीन आणि पाकिस्तानातील संबंध चांगले आहेत. चीनच्या हातचे बाहुले बनण्यापासून दक्ष असायला हवे. एका मोठ्या देशासोबत जोडले जात असताना संभाव्य धोक्याप्रती त्यांनी इशारा दिला आणि पाकिस्तानने आत्मनिर्भर अर्थव्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.‘रिइमेजिनिंंग पाकिस्तान : ट्रान्सफॉर्मिंग अ डिसफंक्शनल न्युक्लिअर स्टेट’ या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते भारतात आले आहेत. हक्कानी म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या संपूर्ण धोरणावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या मोठ्या शक्तीकडून आपला वापर करू देण्याची परवानगी देण्याच्या कारणामुळेच पाकिस्तान वर्तमानस्थितीत आला आहे.‘शांततेने प्रश्न सोडवा’संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानने भारतासोबतचे त्याचे प्रश्न हे शांततामय मार्गांनी सोडवावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. उभय देशांच्या नियंत्रण रेषेवर वाढत्या तणावाबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेज यांनी काळजी व्यक्त केल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सहायक सरचिटणीस (राजकीय व्यवहार) मिरोस्लाव्ह जेन्का यांनी सांगितले.जेन्का यांनी १३ एप्रिल रोजी पाकिस्तानला भेट दिल्यानंतर वरील आवाहन केले. जेन्का यांनी परराष्ट्र सचिव तेहमिना जानजुआ आणि विशेष सचिव तसनीम अस्लम यांची १२ एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्रालयात भेट घेतली.
चीनच्या हातचे प्यादे बनू नका, माजी राजदूत हक्कानींचा पाकिस्तानला सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 3:41 AM