मॉस्को : युक्रेनच्या युद्धात कोणत्याही देशाने हस्तक्षेप तसेच रशियाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना विद्युतवेगाने चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची शस्त्रे आहेत, हे लक्षात असू द्या, असेही त्यांनी म्हटले आहे. पुतिन यांचे हे उद्गार म्हणजे त्यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना दिलेली अण्वस्त्र हल्ल्याची अप्रत्यक्ष धमकी असल्याचे मानले जात आहे.
रशियाने आंतरखंडीय मारा करू शकणारे सरमट हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. त्याची यशस्वी चाचणी या महिन्याच्या प्रारंभी पार पडली. रशियाकडे अण्वस्त्रेही आहेत. पुतिन यांच्या वक्तव्याचा सारा रोख हा या शस्त्रास्त्रांकडे आहे.
रुबलमध्ये बिलाचे पैसे देण्यास पोलंडचा नकाररशियाने पोलंड व बल्गेरिया या देशांना करण्यात येणारा नैसर्गिक वायूपुरवठा थांबविला आहे. या देशांनी बिलाचे पैसे रशियाचे चलन रुबलमध्ये चुकविण्यास नकार दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वी पोलंडचा दौरा करून युक्रेनच्या निर्वासितांची स्थिती जाणून घेतली होती. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनची कड घेतल्यामुळे संतप्त झालेल्या रशियाने आता विविध पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हणाले पुतिन ?युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांना रशिया धडा शिकवण्यास कमी करणार नाही. त्यासाठी लागणारी सर्व शस्त्रास्त्रे आमच्याकडे आहेत. त्याची आम्ही कधी घमेंड बाळगली नाही. वेळ येताच या शस्त्रांचा वापर करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.
खेरसन शहरामध्ये बॉम्ब हल्लेयुक्रेनच्या खेरसन शहरामध्ये बुधवारी मध्यरात्री टेलिव्हिजन मनोऱ्याजवळ प्रचंड स्फोट झाले. त्यामुळे रशिया व यु्क्रेनच्याही दूरचित्रवाहिन्यांचे त्या भागातील प्रसारण थांबले आहे. खेरसनमध्ये युक्रेनच्या लष्कराने बॉम्ब हल्ले केल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाने युक्रेनचे मारियुपोल बंदर व अन्य भागांमध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत.
जपानमध्ये बायडेन - मोदी यांच्यात होणार चर्चा
वॉशिंग्टन : पुढील महिन्यात टोकियो येथे होणाऱ्या क्वाड परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. चीनवर अंकुश ठेवण्यासंदर्भात क्वाड परिषदेत काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. जो बायडेन २० ते २४ मे या कालावधीत दक्षिण कोरिया व जपान या दोन देशांचा दौऱ्यावर जातील. या दौऱ्यात जो बायडेन दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल तसेच जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांचीही भेट घेणार आहेत. त्या देशांशी असलेले आर्थिक, सुरक्षाविषयक संबंध अधिक दृढ करण्यासाठी बायडेन तेथील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. जपानमध्ये २४ मे रोजी क्वाड परिषद होणार आहे. ऑस्ट्रेलिया, जपान, भारत व अमेरिका हे क्वाडचे सदस्य असून, त्या देशांचे प्रमुख नेते या परिषदेत युक्रेन युद्धासह विविध विषयांवर चर्चा करतील.
चीनला रोखणार ?हिंद-प्रशांत महासागराचा परिसर सर्वांसाठी खुला व सुरक्षित असावा, अशी अपेक्षा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात वॉशिंग्टन येथे झालेल्या क्वाड परिषदेत व्यक्त केली होती. चीन सतत काढत असलेल्या कुरापतींना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. चीनकडून होणारा त्रास कमी करण्यासाठी भारत, अमेरिकेसह काही देशांनी प्रयत्न चालविले आहेत.