इस्रायली सैन्य गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर हल्ले करत आहे. एएफपीच्या रिपोर्टनुसार, हवाई हल्ल्यांसोबतच जमिनीवरील हल्लेही तीव्र करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्रायली लष्कराला मोठं यश मिळत आहे. याच दरम्यान, गाझा पट्टी ताब्यात घेण्याचा इस्रायलचा विचार आहे का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. यावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी सांगितलं की, इस्रायली सैन्य गाझा पट्टीमध्ये हमासच्या विरोधात केलेल्या हल्ल्यात उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
बेंजामिन नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, "मला वाटतं की इस्रायली सैन्य चांगली कामगिरी करत आहे. आम्हाला गाझावर राज्य करायचं नाही. आम्हाला ते ताब्यात घ्यायचं नाही, परंतु आम्हाला त्यांना एक चांगलं भविष्य द्यायचं आहे."
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली शहरांवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायल गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई करत आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये जवळपास 1,400 लोक मरण पावले आणि हमासने 220 हून अधिक लोकांचे अपहरण केलं. हमास संचालित गाझामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये सुमारे 10,500 लोक मारले गेले आहेत.
इस्रायल आणि हमासमधील संघर्ष वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारताने 22 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईनच्या लोकांना औषधं आणि वैद्यकीय उपकरणांसह 38 टनांपेक्षा जास्त मदत सामग्री पाठवली होती.