ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 28 - भारतीय प्रसारमाध्यमे विधीनिषेधशून्य वागतात आणि केवळ टेलिव्हिजन रेटिंगचा विचार करून बातम्या देतात असा आरोप करत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या नियामक मंडळाने संवेदनशील पद्धतीने बातमीदारी करण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना केले आहे.
लाहोर, कराची व इस्लामाबादमध्ये घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नियामक मंडळाने सगळ्या प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे. आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्याच्या नादात अतिउत्साहीपणा करू नका, त्यामुळे राष्ट्राचा अॅक्शन प्लॅन धोक्यात येऊ शकतो अशी तंबीही देण्यात आली आहे.
भारतीय प्रसारमाध्यमे निव्वळ व्यावसायिक नफ्यातोट्याचा विचार करत असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ नका, असे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी ब्रसेल्सच्या हल्ल्यांच्यावेळी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ज्या संवेदनशीलतेने वार्तांकन केले त्या व्यावसायिक वृत्तीचे पालन करा असा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय प्रसारमाध्यमांच्या नादी लागून मॅरेथॉन सेशन्स करत बसाल आणि राष्ट्राप्रती संवेदनशीलता दाखवली नाहीत तर पाकिस्तानबाबत देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरीह अस्थिरतेचा संदेश जाईल असा इशारा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना देण्यात आला आहे.
अशा अवघड प्रसंगी वार्तांकन करताना प्रत्येकवेळी सकारात्मक व सारासार विचार करून प्रगल्भ वृत्तीचे दर्शन घडवावे अशी अपेक्षा पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने प्रसारमाध्यमांकडून व्यक्त केली आहे.
PEMRA Advises Channels to responsibly cover Lahore, Islamabad and Karachi incidents today pic.twitter.com/PJO10aQEIi— Report PEMRA (@reportpemra) March 27, 2016