सेओल : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनीने जगातील ग्राहकांना गॅलक्सी नोट ७ स्मार्टफोनचा वापर तत्काळ थांबविण्याचे आवाहन करून होईल तेवढ्या लवकर सदोष फोनच्या बदल्यात फोन देण्याचे आश्वासनही दिले.स्मार्टफोन तयार करणारी ही जगातील सर्वात मोठी कंपनी दक्षिण कोरियाची आहे. अमेरिकेने विमान प्रवाशांना संपूर्ण प्रवासात गॅलक्सी नोट ७ स्मार्टफोन स्वीचड् आॅफ ठेवण्याचे व चार्ज न करण्याचे आवाहन केल्यानंतर सॅमसंग कंपनीने वरील आवाहन केले. जगातील इतरही विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान गॅलक्सी नोट ७ फोन स्वीचड् आॅफ करण्याचे किंवा त्याला चेकड् इन बॅगेत ठेवण्याचे आवाहन केले आहे. सॅमसंग कंपनीने निवेदनाद्वारे जगातील ग्राहकांना तत्काळ गॅलक्सी नोट सेव्हन परत करण्याचे व त्याबदल्यात दुसरा फोन घेण्याचे आवाहन केले. ग्राहक सॅमसंगच्या सर्व्हीस सेंटरला भेट देऊन तात्पुरत्या वापरासाठी भाड्याने फोन घेऊ शकतात. कंपनी दक्षिण कोरियात १९ सप्टेंबरपासून गॅलक्सी नोट सेव्हन नव्या बॅटरीसह उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने या महिन्याच्या प्रारंभी जगभरातून अडीच दशलक्ष गॅलॅक्सी नोट सेव्हन फोन परत मागवले. हा अभुतपूर्व निर्णय होता. (वृत्तसंस्था)
गॅलक्सी नोट-७ फोन वापरू नका
By admin | Published: September 12, 2016 1:40 AM