वॉशिंग्टन : होय, एच १ बी व्हिसाचा फायदा मी सुद्धा घेतलेला आहे; पण या व्हिसामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे हा व्हिसा बंद व्हायलाच हवा असे मत रिपब्लिकनचे एक इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. भारतीय कर्मचारी या व्हिसाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात, हे विशेष. ट्रम्प यांनी येथे एका चर्चेत हे मान्य केले की, ते आपल्या कंपन्यांत उच्च कौशल्याच्या विदेशी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी एच-१ बी व्हिसाचा लाभ घेतात; पण ही सुविधा आता बंद व्हायला हवी. कारण, यामुळे येथील रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. अमेरिकन कर्मचाऱ्यांवर हा अन्याय आहे. सिनेटर मार्को रुबियो यांनीही या व्हिसाविरुद्ध मत व्यक्त करीत टाटा आणि भारत यांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. (वृत्तसंस्था)