मुंबई- सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा उपयोग करकरून स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याच्या स्पर्धेत सगळेच अडकले असताना पाकिस्तानातील अर्शद खान या चहावाल्यावर प्रसिद्धीदेवीने एका रात्रीत कृपादृष्टी दाखवली होती. उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है... म्हणायला लावेल अशी प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली आणि ती ही अचानक. ही घटनाच तशी होती कारण हा चहावाला अॅक्वामरिन वगैरे रंग असलेल्या निळ्या डोळ्यांचा आणि एकदम देखणा आहे. १८ वर्षांच्या या चहावाल्याने पाकिस्तानबरोबर सगळ्या जगाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आणि त्याच्या फोटोवर पोरींच्या अक्षरश: उड्या पडल्या. भारतातील सोशल मीडियामध्येही तो जबरदस्त प्रसिद्ध झाला होता. आता कलिंगड कापणाऱ्या मोहम्मद अवैस नावाच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सुरुवातीला कलिंगडवाला वाटलेला हा मुलगा वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे नंतर सर्वांना समजले. सोशल मीडियावर आजकाल क्षणात प्रसिद्धीच्या शिखरावर जाण्याची संधी कोणालाही मिळू शकते. प्रिया प्रकाश वारियरच्या नेत्रपल्लवी (नव्हे भुवयांची हालचाल) च्या व्हीडिओवर सगळा देश वेडा झाला. तिचा व्हीडिो वायरल झालाच त्याहून तिला शोधून काढून तिच्या मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या. गेल्या आठवड्यात गोविंदाप्रमाणे नाचणाऱ्या काकांचे नृत्यही व्हॉट्सअॅपवर वायरल झाले. त्यांच्याही मुलाखती घेण्यात आल्या. मात्र अगदीच अल्पकाळामध्ये हे लोक समाजाच्या सामुहिक विस्मृतीत जातात. चायवाला आणि तरकारीवाली यांचीही अशीच काहीशी गोष्ट आहे.
अर्शद या चहावाल्या मुलाला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे काम केले ते जिया अली या पाकिस्तानी छायाचित्रकाराने. इस्लामाबादेतील इतवार बजारमध्ये चहाच्या साध्या टपरीवर काम करणाऱ्या या पोराचे (पक्षी: आताच्या हिरोचे) देखणेपण त्यांनी टिपले आणि इंस्टाग्रामवर हॉट टी अशी कॅप्शन लावून टाकले. अर्शदच्या असाधारण देखपणाला इन्स्टाग्रामवर तुफान प्रतिसाद मिळालाच त्यापेक्षा जास्त तो इतर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. त्याला माध्यमांनी शोधून काढले, त्याच्या मुलाखती घेतल्या. बीबीसी असो वा अमेरिकन बातम्यांची संकेतस्थळे एकापाठोपाठ त्याच्या मुलाखती प्रसिद्ध करू लागले आणि चायवाला नावाने तो सगळ्यांच्या चर्चेत महत्वाचा विषय म्हणून जाऊन बसला. हा अर्शद तेथे चहा कशाला विकत बसलाय, त्याने तर सिनेमात नट्यांच्या मागे धावायला हवे अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या तेव्हा अर्शदने त्याची कहाणी सांगितली. १८ वर्षांच्या अर्शदला सतरा भावंडे आहेत. घरची चूल पेटायला मला चहा विकायला लागतो असे त्याने सांगितले. मला सिनेमात करायला आवडेल आणि त्याआधी कुटुंबासाठी मला कमवावेच लागेल असे त्याने सांगितले. आठवड्याभरात प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार झालेल्या अर्शदचा मामा रिझवान काजमी त्याचे सल्लागार झाले आहेत, त्याच्याबरोबर मलिक फहिम त्याचे मॅनेजर झाले आहेत. मात्र आता त्याच्याबद्दल फारशी काहीच माहिती समजत नाही. प्रसिद्धीच्या लाटेवर आरुढ झालेल्या अर्शदबद्दल आता काहीही छापून येत नाही किंवा त्याला डोक्यावर घेणारे लोक त्याचे नावही विसरून गेले असतील.
अर्शदची वाहवा होते न होते तोच नेपाळमधूनही एका मुलीचा फोटो प्रसिद्ध झाला. नेपाळमध्ये असणाऱ्या या तरकारीवाली (भाजी विकणारी) मुलीने अर्शद पाठोपाठ सोशल मीडिया आणि बातम्यांचा सुकाणू स्वत:कडे वळवून घेतला. गोरखा आणि चितवनच्यामध्ये असणाऱ्या झुलत्या पुलावर पाठीवर टोमॅटोचे ट्रे वाहून नेणाऱ्या कुसुम श्रेष्ठ या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाला. अकरावीत असणाऱ्या या मुलीलाही कुटुंबाला मदत करण्यासाठी भाजी विकावी लागते. तिचा फोटो वायरल झाल्यावर अर्शदच्या चायवाला टॅगप्रमाणे कुसुमचा तराकरीवाली हा टॅग प्रसिद्ध झाला. एकूणच या दोघांनी दिवाळीचे दोन आठवडे सोशल मीडियावर चांगलेच गाजवले. हिच्याबद्दलही फारशी माहिती आता कोणाकडेच नाही.अर्शद आणि कुसुमसारख्या लाटा सोशल मीडियावर आजकाल नेहमी अधूनमधून अनुभवायला मिळतात. चार वर्षांपुर्वी व्हाय धिस कोलावरी डी? या गाण्याने अशीच धमाल आणली होती. कोणालाही (आजही) या गाण्याचा अर्थ कळत नव्हता तरीही त्या गाण्यामागे सगळे हात धुवून लागले. त्यानंतर फेसबूकवरही अशा लाटा येत राहतात. सिक्सवर्डस स्टोरीजच्या नावाखाली सहा शब्दांमध्ये गोष्ट सांगण्याचा प्रयत्न असो वा अमरफोटोस्टुडिओ या टॅगखाली आपला लहानपणचा किंवा शाळेतला किंवा ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकणे असो .. या सगळ्या लाटाच आहेत. कधीकधी कविता करुन दुसऱ्याला कविता करायला लावण्याची टूमही निघते. अशा लाटा आल्या की आपण इतरांच्या स्पर्धेत मागे पडू, आपल्याला एखादी माहिती मिळणार नाही या भीतीने इच्छा नसतानाही त्यात लोक सामिल होतात. सोशल मीडियाच्या प्रवाहात राहण्यासाठी ट ला ट जोडून एका दिवसासाठी कविताही करतात. पण लाटेमध्ये राहण्यासाठी हातपाय मारतात. अमेरिकेत समलैंगिकांना विवाहाचा हक्क मिळाल्यावर भरपूर लोकांनी आपले फोटो सप्तरंगी केले होते तसेच फ्रान्समध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यावर फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांत लोकांनी आपले डीपी बुडवले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फेसबूकचा निर्माता मार्क झुकरबर्गच्या भेटीनंतर मार्कने आपला डीपी तिरंगी केला ही बातमी येताच सर्वांनी तोच कित्ता गिरवला. हे सगळे प्रकार म्हणजे या लाटाच आहेत.अर्शद, कुसुम, प्रिया, डान्सिंग अंकल या सगळ्या प्रसिद्धीच्या लाटांमुळे आता क्षणात प्रसिद्धी आणि क्षणात विस्मरण हे कायमचेच झाले आहे. या सगळ्या लाटांचा भाग होताना आपण त्यामध्ये किती वाहात जातो याकडे लक्ष देणंही तितकचं महत्त्वाचं आहे.