नवी दिल्ली- प्रिन्स चार्ल्स काल भारताच्या भेटीवर आले. त्यांच्या स्वागताची छायाचित्रे सर्वत्र प्रसिद्ध झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये आपण त्यांच्या कोटावर एक लहानसे लाल पुष्प पाहिलेच असेल. हे फुल आहे पॉपीचे. ११ नोव्हेंबर या दिवशी इंग्लंड आणि ब्रिटिश राष्ट्रकुल देशांमध्ये पहिल्या महायुद्धाच्या स्मरणार्थ स्मृतीदिन पाळला जातो. त्या निमित्ताने हे पॉपीचे फूल आणि पान कोटावर खोचले जाते. १९१८ सालच्या ११ व्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या ११ व्या दिवशी पहिले महायुद्ध संपले असे समजण्यात येते म्हणूनच या दिवसाला महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.११ नोव्हेंबर रोजी पहिल्या महायुद्धात आणि नंतरही ज्या जवानांनी रणभूमीवर बलिदान दिले त्यांच्या स्मृती जागविल्या जातात. स्मृतीस्थळावर पॉपीच्या फुलांचे चक्र अर्पण केले जाते तर पॉपीच्या फुलांचे इन्स्टॉलेशनही जागोजागी केले जाते. पॉपीच्या प्रतिकृती कोटावर लावण्यासाठी तसेच विविध आकारांच्या बनवून ११ नोव्हेंबरच्या बऱ्याच आधीपासून विक्रीस ठेवल्या जातात. या पॉपी रिमेम्ब्रन्सला अत्यंत महत्त्व आणि आदराचे स्थान उच्चपदस्थांसह सर्वच अधिकारी व सामान्य जनताही देत असते. खुद्द ब्रिटनची राणीही एका पॉपी इन्स्टॉलेशनला भेट देते आणि हुतात्म्यांच्या बलिदानाप्रती आदरांजली अर्पण करते. ब्रिटनचे आजी माजी पंतप्रधान, खासदार, विरोधी पक्षनेते सर्व मतभेद विसरून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर दोन मिनिटे स्तब्धताही पाळली जाते. ११ नोव्हेंबर १९१९ रोजी तत्कालीन राजे पंचम जॉर्ज यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे स्तब्धता पाळल्यानंतर ही प्रथा रूढ झालेली आहे. आता पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्षे पूर्ण होण्याची वेळ आली तरी यामध्ये कोणताही खंड पडलेला नाही.
पॉपी रिमेम्ब्रन्स कविता लिहिणारे ले. कर्नल जॉन मॅकक्राईआता पॉपीची फुलेच श्रद्धांजलीसाठी का वापरली जातात, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे कारण पॉपीचा रंग. लालभडक रंगाची ही फुले धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या रक्ताचे, त्यांच्या त्यागाचे प्रतीक मानले जातात. पॉपीचा या दिवसाशी संबंध जोडला जाण्याचे आणखी एक विशेष कारण आहे. ते म्हणजे ले. कर्नल जॉन मॅकक्राई या कॅनेडियन डॉक्टराची इन फ्लेंडर्स फिल्ड ही कविता. १९१५ साली पहिल्या महायुद्धाच्या फ्लेंडर्स फिल्ड या युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना पाहून त्याने ही कविता लिहिली. आज ही फ्लेंडर्स भूमी फ्रान्स, बेल्जिअम आणि नेदरलँडसमध्ये विभागली गेली आहे. जेथे सैनिकांना वीरमरण आले त्या भूमीवर पॉपीची फुले चटकन उगवून आल्याचे त्याने निरीक्षण केले व त्याला शब्द सुचले, इन फ्लेंडर्स फिल्ड द पॉपीज ब्लो, बिटविन द क्रॉसेस, रो ऑन रोदॅट मार्क अवर प्लेस, अँड इन द स्कायद लार्क्स, स्टिल ब्रेव्हली सिंगिंग फ्लायत्याच्या कवितेमुळे पॉपीला अधिमान्यता जास्तच मिळू लागली.
पॉपीचे विविध प्रकारयुरोपात आढळणाऱ्या लालभडक पॉपी व ११ नोव्हेंबरचे समीकरण एकदम घट्ट आहे. पॉपीचे हे लालभडक, ओपियम पॉपी, हिमालयन ब्लू, व्हाईट पॉपी, असे अनेक प्रकार आढळतात.अनेक ठिकाणी अफू आणि खसखशीसाठी त्यांची शेती केली जाते. या फुलांवर नंतर बोंडांसारखी फळे येतात. त्याला चिरा पाडल्यावर येणारा स्राव गोळा केला जातो, त्यालाच अफू असे म्हणतात. तर या बोंडवजा फळात हजारो लहानशा बिया असतात, त्या आपल्या खसखशीच्या बिया होय. त्या बियांचा वापर अनारशासह अनेक पावाच्या प्रकारांवर घालून खाण्यासाठी केला जातो.
पॉपीचे आकर्षण सर्वांनाचपॉपीचे फूल हे सर्वांच्याच आवडीचे आहे. पहिले महायुद्ध होऊन शतक होत आलं तरी सर्व पिढ्यांमध्ये पॉपी विकत घेऊन ते कोटावर लावण्यासाठी चढाओढ लागते. तरुण मुले अत्यानंदाने हे विकत घेऊन मिरवतात. सोशल मीडियावरही ते अभिमानाने सांगतात.