इस्लामाबाद : असे म्हटले जाते, की आजारी व्यक्तीला त्या आजाराची चिंता अधिक आजारी बनवते. त्यामुळे आजारी रुग्णाने मानसीक दृष्ट्याही ताजेतवाने राहणे आवश्यक असते. कोरोनाने संपूर्ण जगातच थैमान घातले आहे. पाकिस्तानही कोरोनाशी संघर्ष करत आहे. अशातच तेथील डॉक्टरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तेथील डॉक्टर भांगडा करत रुग्णांवर उपचार करत आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये गायक मुश्ताक अहमद चीना यांच्या चिट्टा चोला या प्रसिद्ध गाण्याचे संगित ऐकायला येत आहे. याच गाण्यावर येथील डॉक्टर आणि नर्स भांगडा करताना दिसत आहेत आणि त्यांच्या समोर कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.
पाकिस्तानात गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा 6919 वर पोहोचला आहे. तेथील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेथे कोरोनामुळे आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 17 जणांचा मृत्यू तर गेल्या 24 तासांत झाला आहे तर 1,645 रुग्ण बरेही झाले आहेत.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आतापर्यंत 3,291, सिंधमध्ये 2008, खैबर-पख्तूनख्वामध्ये 912, बलूचिस्तानमध्ये 280, गिलगित-बाल्टिस्तानमध्ये 237, इस्लामाबादमध्ये 145 आणि पीओकेमध्ये 46 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते.